'विवेकाच्या अमृतवाणी' चा समारोप; रसिक श्रोत्यांचा भरभरून प्रतिसाद
सोलापूर, (प्रतिनिधी) : प्रत्येक कर्म सेवाभाव असावा आणि कृतज्ञता असेल तर सिध्दी प्राप्त होते असे प्रतिपादन ज्येष्ठ निरूपणकार विवेकजी घळसासी यांनी केले.
महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर आणि आर्यन क्रिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विवेकाची अमृतवाणी या तीन दिवसीय दिपावलीपूर्व व्याख्यानमालेचा समारोप रविवारी, 01 नोव्हेंबर रोजी सकाळी लोकमान्य टिळक सभागृह (अॅम्फी थिएटर) मध्ये करण्यात आला, त्यावेळी सिध्दी या विषयावर ते बोलत होते. तीन दिवस रसिक श्रोत्यांनी सकाळी 06 वाजताच मोठी गर्दी केली होती.
'चांगलं पेरलं तर चांगलं उगवतं,' हा निसर्ग नियम आहे. प्रत्येकाने आपले कर्म चांगले ठेवले पाहिजे. नाम ही महागंगा आहे. सत्संग भक्तीची प्राप्ती हेच सर्वश्रेष्ठ आहे. बुध्दीचा गर्व बाळगू नये. सिध्दी प्राप्त होणे, हे बुध्दीचे वैभव आहे. नामस्मरणाने दोषमुक्त जीवन जगण्याची सिध्दी प्राप्त होते. नामस्मरणातून अंतरंग जागृत होते, असंही निरूपणकार विवेक घळसासी यांनी सांगितले.
प्रारंभी पु. ना. गाडगीळ अॅन्ड सन्सचे जितेंद्र जोशी आणि भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांच्या हस्ते विवेक घळसासी यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले, त्यानंतर निरूपणाला सुरूवात झाली.
सुखी जीवनाच्या यात्रेसाठी या मुख्य विषयावर यंदाच्या दिवाळीपूर्व विवेकाची अमृतवाणी हे व्याख्यान दि.30, 31 ऑक्टोबर आणि 01 नोव्हेंबर असे तीन दिवस आयोजित करण्यात आले होते. शुक्रवार दि. 30 ऑक्टोबर रोजी साधक तर 31 ऑक्टोबर रोजी साधना आणि तिसर्या दिवशी, 01 नोव्हेंबर रोजी सिध्दी असे तीन विषयावर विवेक घळसासी यांनी निरूपण केले. तीन्ही दिवसात ईश्वराच्या नामस्मरणातून साधना करत सिध्दी प्राप्त करता येते, हे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमासाठी पु. ना. गाडगीळ हे प्रायोजक होते, तर सहप्रायोजक म्हणून सुधा इडली गृह आणि अॅटलान्स तसेच मागास समाजसेवा मंडळाचे सचिन चव्हाण यांचं सहकार्य लाभले.
यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या अध्यक्ष रेणुका महागांवकर, कार्याध्यक्ष प्रशांत बडवे, कार्यवाह जितेश कुलकर्णी, अविनाश महागांवकर, भाजपाचे शहाजी पवार, गुरूशांत धुत्तरगांवकर, रमेश कोल्हापुरे, सुयश गुरूकुलचे केशव शिंदे, डॉ.किरण पाठक, ज्येष्ठ विधिज्ञ धनंजय माने, पु.ना. गाडगीळचे जितेंद्र जोशी, रमेश बसाटे, शरणप्पा शाबादे यांच्यासह मंगळवेढा, पंढरपूर आणि बार्शी तालुक्यातील रसिक श्रोत्यांनी हजेरी लावलेली होती.
निरूपणकार विवेकजी घळसासी यांच्या रसाळवाणीतून झालेल्या या निरूपणाला तीन दिवस सकाळी 6 वाजून 25 मिनिटांनी अॅम्फी थिएटर रसिक श्रोत्यांनी भरून गेले होते.





