डॉ. असदुल्लाह खान इंग्लिश हायस्कूलच्या ‘उरूज’ महोत्सवात विश्वचषक विजेत्या गंगा कदम यांना ‘भारत की बेटी’ पुरस्कार

shivrajya patra

सोलापूर : येथील डॉ. असदुल्लाह खान इंग्लिश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज यांचा 05 वा वार्षिक सांस्कृतिक महोत्सव ‘उरूज’ हुतात्मा स्मृती मंदिर येथे अत्यंत उत्साहपूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात मोठ्या दिमाखात पार पडला. विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासपूर्ण व दर्जेदार सादरीकरणांमुळे कार्यक्रमाने उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. पालकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती असल्याने सभागृह पूर्ण क्षमतेने भरले होते.

विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढवणे व त्यांच्या कलागुणांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश होता. देशभक्ती, शिक्षण, सामाजिक जाणीव व नैतिक मूल्यांवर आधारित नृत्य, नाट्य व सांस्कृतिक सादरीकरणांनी उपस्थितांना प्रभावी संदेश दिला.

दरवर्षीप्रमाणे याही वेळी समाजाच्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला. यामध्ये मौलाना इब्राहिम (जमियत उलेमा-ए-हिंद), तौफिक नदाफ (माध्यम क्षेत्र), डॉ. वसीम बेनेशिरूर (वैद्यकीय शिक्षणातील योगदान), श्री. पुंडलिक कलखंबकर (शिक्षण व वर्गाबाहेरील मार्गदर्शन) तसेच API राहुल डोंगरे (वळसंग पोलीस स्टेशन) यांचा समावेश होता. API राहुल डोंगरे यांनी IPS एसपी सोलापुर ग्रामीण अतुल कुलकर्णी यांच्यावतीने पुरस्कार स्वीकारला.

कार्यक्रमाला वसीम बुरहान (सदस्य, महाराष्ट्र अल्पसंख्यांक आयोग), डॉ. अमजद सय्यद तसेच फारूक शाब्दी (सोलापूर) हे मान्यवर उपस्थित होते. फारूक शाब्दी यांनी आपल्या भाषणात शाळेच्या शैक्षणिक वाटचालीचे व ‘उरूज’ महोत्सवाच्या दर्जेदार आयोजनाचे मनापासून कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातील शिस्त, विषयांची निवड आणि सामाजिक-नैतिक मूल्यांवर दिलेला भर याबद्दल त्यांनी विशेष प्रशंसा केली. त्यांच्या विचारपूर्ण भाषणाला उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली.

या महोत्सवाचा सर्वात अभिमानास्पद क्षण ठरला भारतीय महिला अंध क्रिकेट संघाच्या उपकर्णधार व विश्वचषक विजेत्या कु. गंगा कदम यांचा सन्मान... ! शाळेच्या वतीने त्यांना विशेष ‘भारत की बेटी’ पुरस्कार, रोख पारितोषिक, स्मृतिचिन्ह व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. 

त्यांच्या सन्मानार्थ सादर करण्यात आलेल्या मानवंदना कार्यक्रमाने उपस्थित प्रेक्षक भावूक झाले. गंगा कदम यांचा संघर्षमय प्रवास विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून मर्यादा या केवळ मनात असतात, हा संदेश त्यांनी प्रभावीपणे दिला.

लोकप्रधान न्यूज चे संस्थापक व संपादक अयाज शेख, आझादी बचाओ न्यूज चे अजीम पटेल, माजी नगरसेवक रियाज खरादी आणि वारिस कुडले यांची विशेष अतिथी म्हणून कार्यक्रमास उपस्थिती होती.

कार्यक्रमातील सर्व सांस्कृतिक सादरीकरणे पूर्णतः संस्कारयुक्त, मर्यादित व मूल्याधारित होती. कोणत्याही अनावश्यक अथवा अश्लील विषयांपासून दूर राहून सादर करण्यात आलेल्या कार्यक्रमांमुळे ‘उरूज’ महोत्सवाने शाळेच्या मूल्याधिष्ठित शिक्षणाची प्रचिती दिली.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी शाळेच्या पालक संस्था युनिक एज्युकेशनल सोसायटीचे संस्थापक डॉ. असदुल्लाह खान, विश्वस्त सादुल्लाह खान, नसीन खान, फरहान बामणी, इबादुल्लाह खान तसेच शाळेचे प्राचार्य मोहम्मद साकिब सय्यद उपस्थित होते. 

सर्व मान्यवरांनी शिक्षक व विद्यार्थ्यांच्या परिश्रमांचे कौतुक करताना कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या पालकांचे सहकार्याबद्दल आभार मानले.

To Top