शिक्षक नराधमास मरेपर्यंत जन्मठेप कारावास

shivrajya patra

सोलापूर : मोहोळ पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या दोषारोपावर न्यायालयासमोर आलेले पुरावे आणि अल्पवयीन पिडीतेसह इतरांच्या साक्षी विचारात घेऊन येथील 04 थे जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एन. सुरवसे यांनी पवित्र शिक्षण मंदिरात दुष्कर्म केल्याप्रकरणी धनाजी सोपान इंगळे (वयः ४८, रा. पाटकुल ता. मोहोळ) या नराधम शिक्षकाला मरेपर्यंत जन्मठेप कारावास आणि 50 हजार रूपयांचा दंडाची शिक्षा सुनावली.

अल्पवयीन 12 वर्षीय पिडीता ही शाळेत गेल्यावर तिला शिकवणारे शिक्षक धनाजी इंगळे हे अगोदरच वर्गात हजर होते. त्यांनी पिडीता हिस वर्गात थांबवून घेऊन इतर विद्यार्थ्यांना वर्गाचे बाहेर थांबण्यास सांगून, वर्गामध्येच पिडीतेवर शारिरीक/लैंगिक अत्याचार केले. ही अमानुष घटना, 14 एप्रिल 2023 रोजी घडली. ही घटना शाळेशेजारी शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याने पाहिली व त्याला ही बाब संशयास्पद वाटल्याने त्याने 2-3 दिवस अगोदरपासून शाळेवर व संबंधित शिक्षकांवर लक्ष ठेवले होते. 

त्यानंतर 15 एप्रिल रोजी त्याच्या भावाच्या मदतीने शेतकऱ्यानं त्या वर्गामध्ये सी.सी.टी.व्ही. कॅमेरा लावला. त्या दिवशी ची सकाळची घटना त्या कॅमेऱ्यामध्ये चित्रीत झाली. ही घटना त्या शेतकऱ्याच्या भावाच्या मोबाईलमध्ये ध्वनीमुद्रित झाली होती. 

ते चित्रीकरण घेऊन, त्या शाळेत जावून मुख्याध्यापकांसमक्ष सर्व शिक्षकांना व काही पालकांना बोलावून त्यांचे समक्ष शेतकऱ्यानं कोणाकडून काही गुन्हा घडला असेल तर सर्वांसमक्ष त्याने कबूल करावा, असे विचारणा केली असता प्रथमतः कोणीही समोर येण्यास तयार नव्हते, परंतु माझ्याकडे चित्रीकरण आहे, असे सांगितले असता आरोपी इंगळे याने स्वतःहून समोर आला व माझ्याकडून चूक झाली मला माफ करा, असे बोलला.

त्यांनतर ज्या पिडीतेला14 एप्रिल 2023 रोजी ज्या शेतकऱ्याने पाहिले होते, तिच्या वडीलांना सदरबाबत सांगितले तेव्हा त्यांनी पिडीतेकडे चौकशी केली असता, त्या बालिकेने घाबरुन 4-5 दिवसानंतर शिक्षकाचे दुष्कृत्याबाबत माहिती दिली व असा प्रकार त्या नराधमाने 3-4 पिडीतांसोबत 3-4 वेळा केल्याचे सांगितले. तद्नंतर पिडीतेच्या वडीलांनी मोहोळ पालिस स्टेशन येथे रितसर फिर्याद दाखल केली.

परंतू तपासादरम्यान आरोपीच्या दहशतीमुळे इतर पिडीता तसेच चित्रिकरणामध्ये दिसत असणारी पिडीता ही जबाबाचे वेळी आली नाही, परंतु तिने व तिच्या पालकांनी आम्हाला काहीही जबाब द्यावयाचा नाही असे लिहून दिले. तपास पूर्ण झाल्यावर दोषारोप-पत्र विशेष न्यायालय, सोलापूर येथे दाखल झाले.

चौकशी दरम्यान फिर्यादी, पिडीता, शेतकरी, त्याचा भाऊ ज्याने चित्रीकरण केले होते तो, डॉक्टर यांची साक्ष महत्त्वाची ठरली. इतर पिडीता जरी न्यायालयासमोर अथवा जबाबासाठी आल्या नाही, तरीही 1 पिडीता तसेच चित्रीकरणामध्ये दिसणारी पिडीता, चित्रीकरणाबाबतचा आलेला तपासणी अहवाल यावरुन सदरच्या आरोपीनेच हा गुन्हा केलेला आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे, असा सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राहय धरुन न्यायालयाने आरोपीस भा.द.वि. कलम 354 अ व 354 ब प्रमाणे 01 वर्ष सक्त मजूरी तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 6 प्रमाणे आरोपीस त्याच्या नैसर्गिक मृत्यूपर्यंत जन्मठेप व 50 हजार रुपये दंड व सदरचा दंड पिडीतेस नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश केलेले आहेत.

या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अॅड. सौ. शीतल आ. डोके, आरोपीच्या वतीने अॅड. धनंजय माने यांनी तर मोहोळ पालिस स्टेशनचे पोलिस कॉन्स्टेबल/1896 राजू पवार व तपासी अंमलदार म्हणून सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांनी काम पाहिले.

To Top