सोलापूर : अक्कलकोट तालुक्याचे माजी आमदार तथा भाजपचे ज्येष्ठ नेते, पोलादी पुरुष आणि सहकारातील खंबीर नेतृत्व सिद्रामप्पा मलकप्पा पाटील यांची गुरुवारी रात्री अल्पशः आजारानं येथील खाजगी रुग्णालयात प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानं जिल्ह्यातील एक लढाऊ नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेलं. त्यांनी वयाच्या ८८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
त्यांच्या निधनानं अक्कलकोट तालुक्यासह राजकीय सामाजिक अन सहकार क्षेत्रात शोककळा पसरलीय. त्यांच्या पार्थिवावर मूळ गावी अक्कलकोट तालुक्यातील कुमठे इथं शुक्रवारी दुपारी तीन वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय.
सिद्रामप्पा पाटील यांच्या निधनाचं वृत्त समजताच राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह अनेक नेत्यांनी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तीव्र शोक व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली.
सिद्रामप्पा पाटील यांनी प्रतिकूल परिस्थितीत मोठा संघर्ष उभा करून अक्कलकोट तालुक्यात भाजपाची बांधणी केली, इतकंच नाही तर तालुका भाजपामय केला. सहकार क्षेत्रातील त्यांचं कार्य हे सामान्यजन आणि शेतकऱ्यांना दिलासा देणारं तसेच मोठा आधार देणारं होतं. शेतकरी केंद्रस्थानी ठेऊन आयुष्यभर त्यांच्यासाठी झटणारं एक खंबीर नेतृत्व आज काळाच्या पडद्याआड गेलं, अशी भावना व्यक्त करण्यात आली
गावच्या सरपंचपदापासून पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद उपाध्यक्ष, सोलापूर जिल्हा बँकेचे सलग ३५ वर्षे संचालक, एकवेळ उपाध्यक्ष तसंच श्री स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, मार्केट कमिटी सभापती, तालुक्याचे आमदार असा सिद्रामप्पा पाटील यांचा कर्तृत्ववान राजकीय प्रवास राहिला.
इन सोलापूर न्यूज चॅनल चे ते मार्गदर्शक होते. अक्कलकोट तालुक्याच्या सर्वांगीण विकासात त्यांचा सिंहाचा वाटा राहिला. या दरम्यान अनेक दिग्गज नेत्यांशी सिद्रामप्पा पाटील यांची जवळीक राहिली. भाजप नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे ते कट्टर समर्थक मानले जात.
वयाच्या ८७ व्या वर्षापर्यंत सिद्रामप्पा पाटील यांचं राजकीय आणि सामाजिक कार्य अखंडपणे सुरु होतं. गेल्या काही दिवसापासून त्यांना आजाराने ग्रासलं होतं, दरम्यान सोलापुरातील अश्विनी रुग्णालयात उपचार सुरु असताना रात्री ८ वाजून १७ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
अक्कलकोट तालुका आणि सिद्रामप्पा पाटील असं कायमच एक अतूट नातं राहीलं. इथल्या शेती आणि शेतकऱ्यांसाठी कायमच त्यांनी संघर्षाची भूमिका घेतली, प्रसंगी लढा उभारला शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सहकाराच्या माध्यमातून पर्याय उपलब्ध करून दिला.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाच्या माध्यमातून शेतकरी-कष्टकरी यांना दिलासा देण्याची त्यांची भूमिका राहिली. तालुक्यातील बाजार समितीचा विकास साध्य करताना सिद्रामप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतीमालाला योग्य भाव आणि सुविधा निर्माण करून देण्याचं भरीव कार्य याचा उल्लेख महत्वाचा ठरतो.
लोकहितकारी समाजकारण आणि राजकारणामुळं कायमच त्यांना मोठं जनसमर्थन मिळालं. शेती सहकार यासह शैक्षणिक क्षेत्रासाठी देखील सिद्रामप्पा पाटील यांचं मोलाचं योगदान राहीलं अनेक शैक्षणिक संस्थांचे ते आधारवड अशी त्यांची ख्याती होती.
सिद्रामप्पा पाटील यांनी अक्कलकोट तालुक्यात भाजपाची बांधणी करताना पक्षाला सत्तेपर्यंत नेलं. हा काळ त्यांच्यासाठी संघर्षाचा राहिला, मात्र कोणत्याही परिस्थितीत न डगमगता खंबीरपणे त्यांनी तालुक्याचं नेतृत्व केलं. यामुळं पोलादी पुरुष अशी त्यांची ओळख निर्माण झाली. राजकीय जीवनात त्यांच्यावर हल्ल्याचे देखील प्रकार घडले पण ते परतवून लावताना त्यांचा निडरपणा देखील तालुक्याने अनुभवला.
ज्येष्ठ नेते शरद पवार, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध राहिले. त्यांच्या निधनानं राजकीय, सामाजिक, कृषी, सहकार आणि शैक्षणिक क्षेत्रात पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त करण्यात आलीय.
