तालुका कृषि अधिकारी लाचखोरीत सापडल्यानं खळबळ; पूर्व मंजूरी देण्याकरीता 8 हजारांची लाच

shivrajya patra

सोलापूर : अर्जदाराच्या वडिलांनी महाराष्ट्र शासन कृषी विभागाकडून मिळणाऱ्या शेती कामासाठी मिळणारे कृषी अवजारे मिळण्यासाठी आपले सरकार पोर्टलद्वारे महा-डीबीटी पध्दतीद्वारे ऑनलाईन केलेल्या अर्जास महाडीबीटी पोर्टलवर पूर्व मंजूरी देण्याकरीता 10 हजार रुपयांची लाचेची मागणी करुन तडजोडीअंती 08 हजार लाच स्विकारल्याप्रकरणी तालुका कृषी अधिकारी (वर्ग-2) लोकसेवक धनंजय सुभाष शेटे याच्याविरुध्द लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर च्या पथकाने बुधवारी गुन्हा केला. तालुका  कृषि अधिकारी लाचखोरीत सापडल्यानं कार्यालयात खळबळ उडालीय.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, उत्तर सोलापूर तालुका कृषी कार्यालयातील कृषी अधिकारी लोकसेवक धनंजय सुभाष शेटे (वय-31 वर्षे, सध्या रा. गौरी गणेश नगर, भाजी मंडई जवळ मेजर गुंड यांचे घरी भाड्याने, बाळे, ता. उत्तर सोलापूर) यांनी तक्रारदार यांच्या अर्जास महाडीबीटी पोर्टलवर पूर्व मंजूरी देण्याकरीता 10 हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती.

याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी तक्रारदाराच्या तक्रारीची 25 नोव्हेंबर रोजी पडताळणी करून दुसऱ्या दिवशी बुधवारी, 26 नोव्हेंबर रोजी सापळा रचला होता.

लाचेच्या रक्कमेसंबंधी तडजोडीअंती 08 हजार रुपये इतकी रक्कम घेण्यास संमती देऊन, ती लाच रक्कम बुधवारी उत्तर सोलापूर तालुका कृषी अधिकारी कक्षातील लोकसेवक शेटे बसत असलेल्या समोरील टेबलावरील कागदामध्ये ठेवली असताना आरोपी शेटे याला रंगेहात पकडण्यात आले. आरोपी शेटे (मूळ रा. मु.पो. खेड, ता. कर्जत, जि. अहमदनगर) याच्याविरूध्द गुन्हा नोंद करणेची प्रक्रिया चालू आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक शैलेश पवार, पोलीस निरीक्षक रविंद्र लांभाते, पोलीस अंमलदार- पोह/सलीम मुल्ला, पोह/श्रीराम घुगे, पोह/स्वामीराव जाधव, पोशि/राजू पवार, चापोशि/अक्षय श्रीराम, (सर्व नेम. एसीबी, सोलापूर) यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

To Top