डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी मुंबईसाठी सोडण्यात यावी विशेष रेल्वे गाडी; विविध संघटनांची मागणी

shivrajya patra

सोलापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शुक्रवारी, 05 डिसेंबर रोजी सोलापूरहून मुंबईला जाण्यासाठी विशेष रेल्वेगाडी सोडण्याची मागणी करण्यात  आलीय. या मागणीचं निवेदन सोलापूर जिल्हा रेल्वे प्रवासी संघटना, आधुनिक भारत रेल्वे असंघटीत कर्मचारी संघटना आणि भिमप्रेमी, समविचारी विविध संस्था आणि संघटनांचे अनेक पदाधिकाऱ्यांनी गुरूवारी येथील रेल्वे कार्यालयाच्या विभागीय वाणिज्य व्यवस्थापकांना दिलंय.

भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (14 एप्रिल 1891- 06 डिसेंबर 1956) यांच्या महापरिनिर्वाण दिनी, 06 डिसेंबर रोजी त्यांना अभिवादन करण्यासाठी देशाच्या विविध भागातून मुंबईस्थित दादर 'चैत्यभूमी' वर एकत्र येत असतात.

सोलापूरच्या ऐतिहासिक भूमिकडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक कार्याची प्रारंभ भूमि म्हणून स्वतः बाबासाहेब उल्लेख करीत होते. याचे स्मरण सोलापूरकरांना आजही आहे. या कारणाने सोलापूर जिल्हा आणि आसपासच्या परिसरातून अनुयायी हजारोंच्या संख्येने चैत्यभूमि मुंबईकडे जात असतात.

त्यांच्या प्रवासी सुविधेसाठी अनुयायांसाठी दरवर्षी प्रमाणे यंदाही महापरिनिर्वाण दिनी सोलापूरहून मुंबई विशेष रेल्वे गाडीची सुविधा उपलब्ध करून द्यावी, त्याचबरोबर 05 डिसेंबर रोजी सोलापूरहून मुंबईला निघणारी विशेष रेल्वे संपूर्ण देशास स्वच्छतेचा संदेश देत आपल्या नियोजनानुसार वेळेवर निघून निर्धारीत वेळेत मुंबईला पोहोचावी, अशी मागणी विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी एका निवेदनाद्वारे वाणिज्य व्यवस्थांपकडं केलीय.

महापरिनिर्वाण विशेष रेल्वेगाडी सोलापूर रेल्वे स्थानकावरुन प्लॉटफॉर्म नं. 01 वरुन सिध्देश्वर एक्सप्रेसच्या आगोदर सोडण्यात यावी, अचानक प्लॉटफॉर्म नं. 01 चा बदल झाल्यास त्यात अनुयायांची पळापळ धावपळ होऊन त्याचा सुरक्षा व्यवस्थेवर ताण पडतो. त्यातून लहान-सहान अपघाताची शक्यता असते. त्यामुळे जखम झाल्यावर पट्ट्या लावण्यापेक्षा जखम होण्यापूर्वी काळजी घेतली जावी, अशी रेल्वे प्रवाशी म्हणून मुंबईकडं मार्गस्थ होऊ पाहणाऱ्या अनुयायांची आग्रही मागणी आहे.

या विशेष गाडीची मुंबईकडे निघण्याची वेळ दि. 05 डिसेंबर रोजी रात्री 09.00 अशी असावी. परतीच्या प्रवासाकरीता दि. 06 डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून रात्री 11.45 वाजता सोडून सोलापूर येथे दि. 07 डिसेंबर रोजी सकाळी 08.00 वाजता पोहोचावी.

ग्रामीण भागातील भिम अनुयायांची मागणी विचारात घेऊन विशेष गाडी मोहोळ, माढा, जेऊर, दौंड, पुणे, कल्याण, ठाणे येथे थांबे मंजूर करावेत. प्रवासात अनुयायांची गैरसोय होऊ नये, याकडे रेल्वे प्रशासनाने विशेष लक्ष द्यावं, असंही त्या निवेदनात उल्लेखिले आहे.

विशेष गाडी प्लॅटफॉर्म नं. 01 वरून सिध्देश्वर एक्सप्रेसच्या आगोदर सोडली तरीही पुढे मध्येच कुठेतरी सिग्नलला थांबवत असतात, असे होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनास सक्त सूचना देण्यात यावी, तसेच महापरिनिर्वाण दिनी सोडल्या जात असलेल्या विशेष रेल्वे गाडीतील सुख सुविधा काढून घेतल्या जातात. हा दरवर्षीचा अनुयायांचा कटु अनुभव असल्याचे बोलले जाते. याकडेही रेल्वे प्रशासनाने विशेष लक्ष द्यावं, अनुयायांचा प्रवास सुखकर व्हावा, असा आग्रह त्या निवेदनाद्वारे करण्यात आला आहे.

या निवेदनावर संजय पाटील (अध्यक्ष-प्रवासी सेवा संघ, सोलापूर), राशिद शेख (सचिव-आधुनिक भारत रेल्वे असंघटित कर्मचारी संघटना), निता सोनवणे (सहसचिव-आधुनिक भारत रेल्वे असंघटित कर्मचारी संघटना), दिपक बनसोडे (संपर्क प्रमुख- बहुजन फाऊंडेशन, सोलापूर), अस्लम शेख (कार्याध्यक्ष-आधुनिक भारत रेल्वे असंघटीत कर्मचारी संघ), गौतम कांबळे (संस्थापक अध्यक्ष- बहुजन फाऊंडेशन, भिम संघर्ष दल प्रमुख), सुरज साबळे (माजी अध्यक्ष - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समिती), अशोक रजपुत (संस्थापक अध्यक्ष-वसंत सेना, सोलापूर), मयुर भोज (आधुनिक भारत रेल्वे असंघटीत कर्मचारी संघटना), रोहित अंबुरे,रमेश पवार (सामाजिक कार्यकर्ते), ऋषिकेश जोगळेकर (आधुनिक भारत रेल्वे असंघटीत कर्मचारी संघटना) आणि सतिश लोकरे (बहुजन फाऊंडेशन, सोलापूर) यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

या निवेदनाची प्रत माहितीस्तव वरिष्ठ पोलिस निरीक्षक, (लोहमार्ग पोलिस ठाणे, सोलापूर), वरिष्ठ पोलिस निरीक्षक (रेल्वे पोलिस फोर्स, आर. पी. एफ. सोलापूर) आणि रेल्वे स्टेशन मास्तर (सोलापूर) यांना देण्यात आल्याचंही सांगण्यात आलंय.

To Top