ग्रामीण भागातील जनतेला दर्जेदार आरोग्यसेवा मिळवून देण्याचा प्रयत्न : नेताजी खंडागळे

shivrajya patra

सोलापूर : “ग्रामीण भागातील जनतेला शहरी भागात उपलब्ध असलेली दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी, हा या नेत्र चिकित्सा शिबिर आयोजनामागील उद्देश आहे.” असं प्रतिपादन सह्याद्री फाउंडेशनचे अध्यक्ष आणि उळेगांवचे उपसरपंच नेताजी खंडागळे यांनी केले.

अक्कलकोट विधानसभा मतदार संघाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त, H.V. देसाई हॉस्पिटल पुणे अंतर्गत शंकरशेठ साबळे हॉस्पिटल, सोलापूर व सह्याद्री फाउंडेशनचे अध्यक्ष तथा उळे उपसरपंच नेताजी खंडागळे यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय मोफत नेत्र तपासणी, मोफत चष्मे वाटप आणि मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरांचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या शिबीराच्या प्रारंभी नेताजी खंडागळे बोलत होते.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील तांदुळवाडी, मुस्ती आणि बोरामणी येथे सलग तीन दिवस करण्यात आले. ग्रामस्थ, विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी या शिबिराला मोठा प्रतिसाद दिला. एकूण 600 रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली, त्यापैकी 150 रुग्णांमध्ये मोतीबिंदूचे निदान झालं आहे, तर 365 रुग्णांना चष्मे मोफत वाटप करण्यात आले.

या उपक्रमासाठी सहकार्य लाभलेले सर्व वैद्यकीय अधिकारी, ग्रामपंचायती, स्वयंसेवक आणि सह्याद्री फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांचं खंडागळे यांनी आभार मानले.

शिबिरानंतर निदान झालेल्या रुग्णांना शंकरशेठ साबळे हॉस्पिटल, सोलापूर येथे नेऊन मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली. ग्रामीण भागात आरोग्य सेवा पोहोचविण्याच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

To Top