बालाजी अमाईन्स रोटरी इंडियाच्या ‘बेस्ट प्रोजेक्ट अवॉर्ड’ ची मानकरी

shivrajya patra

आरोग्य क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल राष्ट्रीय पातळीवरील गौरव

दिल्ली : देशातील उद्योगसमूहांच्या सामाजिक जबाबदारीतील (सीएसआर) उल्लेखनीय योगदानाची दखल घेत रोटरी इंडियाच्या वतीने ‘रोटरी इंडिया नॅशनल सीएसआर अवॉर्ड 2025’ जाहीर करण्यात आले. होते. या पुरस्कारांमध्ये बालाजी अमाईन्स लिमिटेड, सोलापूर ही कंपनी राष्ट्रीय स्तरावरील मोठ्या उद्योगसमूह गटात आरोग्य क्षेत्रासाठी ‘बेस्ट प्रोजेक्ट’ या पुरस्काराची मानकरी ठरलीय.

गुरुवारी, 13 नोव्हेंबर रोजी नवी दिल्ली येथील माणेकशॉ सेंटर येथे हा पुरस्कार समारंभ पार पडला. रोटरी इंटरनॅशनलचे संचालक  के. पी. नागेश यांच्या हस्ते बालाजी अमाईन्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक  डी. राम रेड्डी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. 

या प्रसंगी रोटरी इंटरनॅशनलचे अध्यक्ष शरत जैन, सचिव  मंजू फडके, तसेच रोटरी इंडिया नॅशनल सीएसआर अवॉर्ड समितीचे अध्यक्ष डॉ. शैलेश पालेकर उपस्थित होते.

सोलापूरमधील अलिफॅटिक अमाईन्स आणि स्पेशालिटी केमिकल्स उत्पादन क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी म्हणून ओळख असलेल्या बालाजी अमाईन्स लिमिटेडने व्यावसायिक यशासोबतच सामाजिक जबाबदारीतही उल्लेखनीय योगदान दिले आहे. विशेषतः आरोग्यसेवा क्षेत्रात कंपनीने राबविलेल्या उपक्रमांमुळे हजारो नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

कोविड काळापासून कंपनीने आरोग्य सेवेच्या बळकटीसाठी सातत्याने काम केले असून, सोलापूर शहरातील तीन रुग्णालयांचे नूतनीकरण करून अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या रुग्णालयांमार्फत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना अत्यल्प किंमतीत अथवा विनामूल्य वैद्यकीय सेवा दिल्या जात आहेत. अत्याधुनिक उपकरणे, सुसज्ज इमारती यांमुळे ही रुग्णालये कोणत्याही कॉर्पोरेट रुग्णालयांच्या तोडीस तोड ठरली आहेत.

या सन्मानाबद्दल बोलताना बालाजी अमाईन्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक डी. राम रेड्डी म्हणाले, कंपन्यांवर सीएसआर ची जबाबदारी कायदेशीररीत्या लागू होण्यापूर्वीच आमच्या व्यवस्थापनाने 1990 च्या दशकात बालाजी फाउंडेशनच्या माध्यमातून समाजसेवेची पायाभरणी केली होती. 

आरोग्य, स्वच्छता, शिक्षण, क्रीडा आणि पर्यावरण या क्षेत्रांमध्ये आम्ही सातत्याने कार्यरत आहोत. आमचे चेअरमन ए. प्रताप रेड्डी नेहमी सांगतात की, ‘ज्या समाजातून आपण कमावतो, त्यालाच काहीतरी परत द्यावे, हीच खरी सामाजिक जबाबदारी आहे.’ रोटरी इंडियाकडून राष्ट्रीय स्तरावरील हा सन्मान मिळणे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे.

हा पुरस्कार बालाजी अमाईन्स लिमिटेडच्या समाजाभिमुख दृष्टीकोनाचा आणि दीर्घकालीन सामाजिक बांधिलकीचा गौरव असून, कंपनीचे आरोग्य, शिक्षण आणि समाजकल्याण क्षेत्रात उभारलेले कार्य इतर उद्योगसमूहांसाठी प्रेरणादायी ठरतअसल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.

To Top