वैवाहिक जीवनातील घरगुती कारणावरून झालेल्या त्रासाला क्रौर्य म्हणता येणार नाही : मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

shivrajya patra



सोलापूर : वैवाहिक जीवनातील घरगुती कारणावरून झालेल्या त्रासाला क्रौर्य म्हणता येणार नाही, असे मत व्यक्त करून आत्महत्या केलेल्या महिलेचा पती, दीर,  विधवा नणंद यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून दाखल झालेला खटला मुंबई उच्च न्यायालय कोल्हापूर खंडपीठाने रद्द केला. 


उच्चशिक्षित असलेल्या मयत महिलेचा पती संगणक अभियंता म्हणून काम करत होता. लहानपणी वडील वारल्यानंतर त्याचा सांभाळ त्याच्या विवाहित बहिणीने केला. त्यास उच्च शिक्षण दिले. बहिणीच्या पतीचे निधन झाल्यानंतर भावाने निराधार बहीण व तिची लहान मुले यांना स्वतःच्या घरी सांभाळण्यासाठी आणले. 

नवऱ्याची बहीण व तिची मुले राहण्यास आल्यानंतर वाढलेल्या घरगुती कामावरून पत्नी नेहमी पतीबरोबर भांडण करत होती. बहिणीपासून वेगळे राहण्याची वेळोवेळी मागणी करत होती. त्यास  पतीने नकार दिला. त्यामुळे पती-पत्नीमध्ये वाद निर्माण झाला होता. पत्नी माहेरी निघून गेली. 

पत्नीने सोलापूर आयुक्तालयातील भरोसा सेलमध्ये पती, दीर विधवा नणंद यांच्याविरुद्ध तक्रारी अर्ज दाखल केला होता. या अर्जाच्या चौकशीनंतर पत्नी दुचाकीवरून भरवेगाने घराकडे जात असताना तिचा दुचाकीवरील ताबा सुटला व दुचाकी पोलीस आयुक्तालयाच्या भिंतीला धडकली व त्यात तिचा मृत्यू झाला. 

याबाबत सदर बझार पोलिस स्टेशनला खबर देण्यात आली होती. पोलिसांनी तपास केल्यानंतर सदर महिला हिने भरवेगाने दुचाकी चालून भिंतीला धडक झाल्याने अपघातात मरण पावली, स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत झाली, असा निष्कर्ष काढून प्रकरण निकाली काढले होते.


बहिणीच्या मृत्यूनंतर सहा महिन्यानंतर भावाने त्याच्या बहिणीचा नवरा, दीर, नणंद हिला क्रौर्यानं वागवले आणि तिचा छळ जाचहाट केला अशी फिर्याद दिली होती. ही फिर्याद रद्द होण्यासाठी तिन्ही आरोपींनी ॲड. जयदीप माने यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 


या याचिकेची सुनावणी उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच येथे झाली. सदर याचिकेच्या सुनावणी दरम्यान ॲड. जयदीप माने यांनी  असा युक्तिवाद केला की, वैवाहिक जीवनातील घरगुती कारणावरून झालेल्या त्रासाला क्रौर्य म्हणता येणार नाही, ४९८ अ  कलमाचा गुन्हा झाला, असे म्हणता येणार नाही. त्याचप्रमाणे या महिलेचा मृत्यू दुचाकी अपघातात झालेला आहे, तसेच पोलीस रेकॉर्ड आहे, तरी देखील तिच्या भावाने आरोपीविरुद्ध फिर्याद दिली. 


घरगुती कारणावरून झालेल्या त्रासाला क्रौर्य म्हणता येणार नाही,  अपघातात मृत्यू झालेला असल्यामुळे आत्महत्येस प्रवृत्त केले असा गुन्हा निष्पन्न होत नाही, असे मत व्यक्त करून उच्च न्यायालयाने  आरोपींविरुद्ध असलेला खटला (चार्जशीट) रद्दबातल केला.


या प्रकरणात आरोपींतर्फे ॲड. जयदीप माने ,ॲड. मिहीर मोंडकर यांनी तर सरकारतर्फे ॲड. अविनाश नाईक यांनी काम पाहिले.   

****

चौकट

हा निकाल कायद्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण

ऑल महाराष्ट्र लॉ रिपोर्टर क्रिमिनलमध्ये प्रसिद्ध !

हा निकाल कायद्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मार्गदर्शक असल्यामुळे कायद्याचे पुस्तक 2026 ऑल महाराष्ट्र लॉ रिपोर्टर क्रिमिनलमध्ये प्रसिद्ध करण्यात आलं आहे.

To Top