बज़्म-ए-गालिबकडून डॉ. आसिफ इक्बाल यांच्या सन्मानार्थ मुशायरा

shivrajya patra

सोलापूर/सोहेल शेख : सोलापूर शहरातील समृद्ध आणि प्रतिष्ठित साहित्यिक वारसा लाभलेली संस्था ‘बज़्म-ए-गालिब’ यांच्यावतीने एस. एस. ए. उर्दू प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक व ‘नया आसमान’ या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे निर्माते डॉ. आसिफ इक्बाल यांच्या सन्मानार्थ एका विशेष साहित्यिक बैठकीचं अर्थात ‘महफिल-ए-मुशायरा’ चे आयोजन रविवारी, 08 नोव्हेंबर रोजी सकाळी 11:30 वाजता मुस्लिम बादशाह पेठ येथील ‘बज़्म-ए-गालिब’ येथे आयोजित करण्यात आले आहे. 


स्वर्गीय बशीर परवाज यांनी आपल्या निस्सीम निष्ठेने, निःस्वार्थ समर्पणाने आणि अखंड ध्यासाने बज़्म-ए-गालिबची पाळेमुळे भक्कम करून या संस्थेला एका विशाल वटवृक्षाचे स्वरूप मिळवून दिले आहे. याच संस्थेच्या छत्राखाली उर्दू साहित्याची परंपरा सातत्याने विस्तारत आहे.



आपल्या या सन्मानाविषयी भावना व्यक्त करताना डॉ. आसिफ इक्बाल म्हणाले की, ज्या संस्थेच्या सावलीत आपला साहित्यिक प्रवास घडला, त्याच बज़्म-ए-गालिबकडून मिळालेली ही सन्मानाची थाप अत्यंत मोलाची आहे. 


या संस्थेशी आपले नाते बालपणापासूनचे असून ते केवळ संस्थेच्या वाटचालीचे साक्षीदार नसून भावनिक व साहित्यिकदृष्ट्याही या उपक्रमांशी जोडलेले आहेत. हा सन्मान केवळ एक औपचारिक सोहळा नसून बालपणापासून जोडल्या गेलेल्या संस्थेचे प्रेम आणि आपुलकीची पावती असल्याचे सांगत त्यांनी संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानलं आहे. या कविसंमेलनाचे सूत्रसंचालन वजाहत अब्दुल सत्तार हे करणार आहेत. 


या मैफलीत डॉ. आसिफ इक्बाल यांच्यासह सोलापूर शहर तसेच बाहेरील नामांकित शायर आपल्या निवडक आणि प्रभावी रचना सादर करणार आहेत. कार्यक्रमाचे संयोजन इरफान कारीगर यांनी केले असून, बज़्म-ए-गालिबचे उपाध्यक्ष, सर्व सदस्यांनी सोलापूर शहर आणि परिसरातील सर्व साहित्यप्रेमींना या साहित्यिक मैफलीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केलं आहे.

To Top