फौजदार चावडी पोलीस स्टेशनकडील गुन्ह्यात न्यायालयाची महत्त्वपूर्ण कामगिरी; आरोपी दोषी घोषित
सोलापूर : अल्पवयीन बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याच्या गंभीर प्रकरणात सोलापूर येथील विशेष पोक्सो न्यायालयाने आरोप सिद्ध दोषी नागेश राजू तलाठी (वय-28 वर्षे) यास पोक्सोच्या विविध कलमांखाली दोषी ठरवून 20 वर्षांची सक्तमजुरी आणि 1, 000 रुपये रोख दंडाची कठोर शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश भस्मे यांच्या न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.
घटनेचा संक्षिप्त तपशील असा की, ही घटना दिनांक 31 डिसेंबर, 2021 रोजी सायंकाळी सुमारे 05:30 वाजण्याच्या सुमारास घडली होती. फिर्यादी यांच्या घरासमोर भाड्याने राहणारा आरोपी नागेश राजू तलाठी याने फिर्यादी यांच्या सुमारे 09 वर्षे 07 महिने वयाच्या अल्पवयीन बालिकेस पाणी भरण्याचा पाईप मागण्याच्या बहाण्याने आपल्या घरी बोलावून घेतले.
त्यानंतर आरोपीने बालिकेचा हात पकडून तिला भिंतीकडे ढकलले व खाली पाडून तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. बालिकेने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने तिचे तोंड दाबून ठेवले.
यावेळी आरोपीचा मुलगा तेथे आल्याने बालिकेची सुटका झाली व तिने घाबरून घरी पळ काढला आणि आईला सर्व प्रकार सांगितला. याप्रकरणी बालिकेच्या आईच्या फिर्यादीवरून फौजदार चावडी पोलीस ठाण्यात, कलम भा. दं. सं. कलम 376,376 (2) (i) व बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा (POCSO) कलम 4, 6, 8 आणि 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा सखोल तपास करुन पोलीस उपनिरीक्षक सतीश भोईटे यांनी विशेष खटला क्र. 53/2022 अन्वये न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. न्यायालयाने आरोप सिद्ध दोषी नागेश तलाठी याला 20 वर्षांची सक्तमजुरी आणि 1, 000 रुपये रोख दंडाची कठोर शिक्षा सुनावली.
या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता अॅड. श्रीमती डोके यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. वरिष्ट पोलीस निरीक्षक फौजदार चावडी यांच्या मार्गदर्शनात कोर्ट पैरवी म्हणून पोशि विक्रांत कोकणे यांनी काम पाहिले तर दोषसिद्धी कक्षकडील सपोनि डाकेवाड व संपूर्ण टिम यांचा सहभाग होता.
------ चौकट ------
... असा आहे शिक्षेचा तपशील
1. पॉक्सो कायदा कलम 4 - 10 वर्षे सक्तमजुरी व 500 रुपये दंड. (दंड न भरल्यास 3 महिने साधी कैद.)
2. पॉक्सो कायदा कलम 6 - 20 वर्षे सक्तमजुरी व 1,000 रुपये दंड. (दंड न भरल्यास 3 महिने साधी कैद.)
3. पॉक्सो कायदा कलम 8 - 3 वर्षे सक्तमजुरी व 250 रुपये दंड. (दंड न भरल्यास 2 महिने साधी कैद.)
4. पॉक्सो कायदा कलम 12 - 2 वर्षे सक्तमजुरी व 250 रुपये दंड. (दंड न भरल्यास 2 महिने साधी कैद.)
****
पोलीस आयुक्तालयाचं आवाहन !
बालकांवरील लैंगिक अत्याचारासारखे गंभीर गुन्हे रोखण्यासाठी पोलीस विभाग कटिबद्ध असून, अशा गुन्ह्यांतील आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रभावी तपास, शास्त्रोक्त पुरावे संकलन आणि न्यायालयीन कामकाजामध्ये योग्य समन्वय ठेवण्यास प्राधान्य दिले जात आहे. बालकांवरील अत्याचारासंदर्भात कोणतीही माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असं आवाहन पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
