सोलापूर : शेतजमिनीच्या बांधाच्या वादावरून फिर्यादीस विळा आणि खुरपी घेऊन जीवे मारण्याची धमकी दिली आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या आरोपावरून छोटे पीर दस्तगीर पटेल याच्यासह 09 जणांविरुद्ध भरण्यात आलेल्या खटल्याची सुनावणी पंढरपूरच्या विशेष सत्र न्यायालयात होऊन न्यायाधीशांनी सरकार पक्षाचा पुरावा विसंगत पूर्वक असल्याने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
या खटल्याची हकीकत अशी की, सांगोला तालुक्यातील घेरडी येथील फिर्यादीने खरेदी केलेल्या जमिनीच्यालगत आरोपीची शेतजमीन होती. फिर्यादीच्या 44 गुंठे जमिनीत आरोपीने अतिक्रमण करून जमीन बळकवली आणि त्याबाबत सरकारी मोजणी करून घेतली, दगड रोऊन तार कंपाऊंड केले होते.
मात्र आरोपींनी हद्दीच्या खुणांचे दगड उपटून काढले आणि घटनेदिवशी, 16 नोव्हेंबर 2018 रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घेरडी शिवारातील शेतात फिर्यादी गेला असताना आरोपींनी त्याला जीवे मारण्याची धमकी दिली आणि जातीवाचक शिवीगाळ केली, असं सरकार पक्षाचे म्हणणे होते.
याप्रकरणी विभागीय पोलीस अधिकारी यांनी छोटे पीर पटेल, समीश पटेल, जंगलू पाशा पाटील, मैनुलाल पाटील, मोहसीन पाटील, बिरा निमग्रे, दादासाहेब करंडे, सरुबाई निमग्रे आणि कमल गरंडे (सर्व रा. घेरडी) यांच्याविरुद्ध विशेष न्यायालयात दोषारोपपत्र पाठवले होते.
खटल्याच्या सुनावणीदरम्यान आरोपी छोटे पीर पटेल याचं निधन झाले होते. सरकार पक्षाचा पुरावा विसंगतपूर्वक आहे, त्यामुळे या पुराव्यावर विश्वास ठेवता येणार नाही, असा युक्तिवाद आरोपी पक्षातर्फे करण्यात आला होता.
याप्रकरणी आरोपीतर्फे ॲड. धनंजय माने, ॲड. जयदीप माने, ॲड. सिद्धेश्वर खंडागळे, ॲड. सुहास कदम आणि ॲड. वैभव सुतार यांनी काम पाहिले.
