सोलापूर : जिल्ह्यातील पंढरपूर, सांगोला, कामती, मंगळवेढा आणि मंद्रूप पोलीस ठाण्याबरोबर नांदेड आणि जळगाव जिल्ह्यात विविध कलमाखाली 09 गुन्हे दाखल असलेल्या शरद विठ्ठल कोळी या सराईत गुन्हेगारास एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्द करण्यात आले. त्याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आल्यानंतर त्याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आलीय.
मूळचा मोहोळ तालुक्यातील अर्धनारी गावचा रहिवासी शरद कोळी याच्याविरुद्ध खूनाचा प्रयत्न, खंडणी मागणे, घातक हत्याराचा वापर करून इच्छापूर्वक दुखापत, जबरी चोरी आणि इतर कलमान्वये गंभीर स्वरूपाचे 09 गुन्हे दाखल असल्याचे ग्रामीण पोलिसांनी सांगितले.
जिल्ह्यात शांतता राखावी, ग्रामीण हद्दीत शरिराविषक तसेच मालाविषक गुन्हे वारंवार करणाऱ्या तसेच सामान्य नागरिकांना उपद्रव करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर, त्यांनी गुन्हेगारी कृत्य केल्यावर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे तसेच त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांना वेळीच आळा बसावा, यासाठी प्रभावी प्रतिबंधक कार्यवाही करण्याबाबत स्पष्ट आदेश पोलीस अधीक्षक (सोलापूर ग्रामीण) अतुल वि. कुलकर्णी यांनी यापूर्वीच दिले आहेत.
गंभीर गुन्ह्यामध्ये शरद कोळी याच्यावर कायदेशीर कारवाई करून प्रतिबंधक कारवाई म्हणून त्यास यापूर्वी हद्दपार करण्यात आले होते, परंतु त्याने पुन्हा-पुन्हा गुन्हेगारी कृत्य करुन सर्वसामान्य लोकांमध्ये त्याने दहशत आणि भिती निर्माण करुन सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण केली होती. त्याच्या या वाढत्या गुन्हेगारी वृत्तीवर आळा घालण्यासाठी पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लवार (पंढरपूर तालुका पोलीस ठाणे) यांनी जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाकडं M.P.D.A. कायद्यान्वये प्रस्ताव सादर केला होता. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्तिकेयन यांनी सदर प्रस्तावाची पडताळणी करून शरद कोळी यास M.P.D.A. कायद्यान्वये स्थानबध्द करण्यासंबंधीचा आदेश निर्गमित केले.
पोलीस निरीक्षक संजय जगताप (स्थानिक गुन्हे शाखा) यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. विजय शिंदे यांच्या पथकाने शरद कोळी याचा शोध घेत, सांगली जिल्ह्यातून त्यास ताब्यात घेऊन पुढील कारवाईकरीता पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. तेथील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पुढील स्थानबध्दतेसाठी शदर कोळी याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली.
शरद कोळी याच्या स्थानबध्दतेचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी निर्गमीत केले. ही कारवाई पोलीस अधीक्षक (सोलापूर ग्रामीण) अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, अपर पोलीस अधीक्षक (पंढरपूर विभाग) श्रीमती. प्रेरणा कट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी (पंढरपूर) प्रशांत डगळे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय जगताप (स्थानिक गुन्हे शाखा), पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लवार (पंढरपूर तालुका पोलीस ठाणे), स.पो.नि. विजय शिंदे व पोहेकॉ मनसावाले, पोहेकॉ शेख, पोहेकॉ गोरे, पोहेकॉ घाडगे, पोकॉ अत्तार, पोकॉ रामगुडे, पोकॉ घोरपडे (ने. स्थानिक गुन्हे शाखा), पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याकडील पोकॉ सागर गवळी, पोकॉ खांडेकर, पोकॉ गावडे, पोकॉ चव्हाण, इतर अधिकारी आणि अंमलदार यांनी तसेच जिल्हादंडाधिकारी कार्यलयाकडील उत्कर्ष देवकुळे, नायब तहसिलदार, विलास म्हेत्रे यांनी पार पाडली.
***
... यापुढंही सुरू राहणार प्रतिबंधक कारवाईची मोहिम : अतुल कुलकर्णी
सोलापूर ग्रामीण हद्दीतील शरिराविषक व मालाविषयक, वाळू तस्कर, अवैध दारू विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगारांचे गुन्हेगारी अभिलेख तयार करण्यात आले असून त्यांच्या विरूध्द M.P.D.A. कायद्यान्वये यापुढे देखील अशाच स्वरूपाची प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार असल्याबाबतचा इशारा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिला.

