मागण्यांचे निवेदन केंद्र सरकारच्या संबंधित विभागांना देण्याचं पोलिसांचे आश्वासन
नवी दिल्ली : ऊसाला रास्त आणि किफायतशीर दर मिळावा, साखरेला योग्य बाजारभाव मिळावा तसेच इथेनॉलच्या दरात वाढ करावी, यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच केली. महात्मा गांधी जयंतीदिनी, 02 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतून हजारोंच्या संख्येने निघालेले ऊस उत्पादक शेतकरी 05 ऑक्टोबरच्या पहाटे दिल्लीच्या वेशीवर दाखल झाले. दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांना राजधानीत प्रवेश करू न देण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. मात्र, पोलिसांचा विरोध झुगारून अखेर शेतकऱ्यांनी जंतर-मंतरपर्यंत मजल मारली.
सोलापूर, सांगली, सातारा, अहिल्यानगर यासह महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांमधून ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. पहाटेपासूनच दिल्लीच्या विविध भागांत शेतकरी आणि पोलिसांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दिल्लीच्या वेशीवरील नोएडा बॉर्डर परिसरात सुमारे एक हजार ते बाराशे शेतकऱ्यांना पोलिसांनी रोखून धरले, तर सुमारे 200ते 300 शेतकऱ्यांना दिल्लीतील प्रीती पोलिस ठाण्यात स्थानबद्ध करण्यात आलं.
पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त; तरीही गाठलं जंतर-मंतर
शेतकरी दिल्लीत पोहोचू नयेत, यासाठी दिल्ली पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावला होता. मात्र, आंदोलन कोणत्याही परिस्थितीत जंतर-मंतरपर्यंत घेऊन जायचे, असा निर्धार शेतकऱ्यांनी केला होता. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनातील कार्यकर्ते सचिन पाटील आणि अजित बोरकर यांनी काही निवडक सहकाऱ्यांसह पोलिसांचा अडथळा पार करत अखेर जंतर-मंतर मैदान गाठले आणि तेथे आंदोलनाला सुरुवात केली.
दरम्यान, समाधान फाटे आणि दीपक भोसले यांच्यासह अनेक शेतकऱ्यांना दिल्ली पोलिसांनी स्थानबद्ध केले. त्यानंतर सचिन पाटील आणि अजित बोरकर यांनी जंतर-मंतर गाठून आंदोलनाची धुरा सांभाळली.
पहाटे तीनपासून सायंकाळपर्यंत संघर्ष
05 ऑक्टोबर रोजी पहाटे तीन वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकरी आणि दिल्ली पोलिसांमध्ये तीव्र संघर्षाचं वातावरण होते. शेतकऱ्यांना दिल्लीच्या मध्यवर्ती भागात पोहोचू न देण्यासाठी पोलिसांकडून वारंवार अडवणूक करण्यात येत होती. मात्र, शेतकऱ्यांनी आपला निर्धार कायम ठेवत आंदोलन सुरूच ठेवले.
जंतर-मंतरवर पोहोचलेल्या शेतकऱ्यांनी स्थानबद्ध करण्यात आलेल्या सर्व शेतकऱ्यांची सुटका करावी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन केंद्र सरकारच्या संबंधित विभागांपर्यंत पोहोचवावे, अशी मागणी लावून धरली.
मागण्यांचे निवेदन संबंधित खात्यांना देण्याचे आश्वासन
दीर्घकाळ चाललेल्या चर्चेनंतर दिल्ली पोलिसांनी स्थानबद्ध केलेल्या शेतकऱ्यांना सोडून देण्याचे तसेच आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांचे निवेदन केंद्र सरकारच्या संबंधित खात्यांच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे मान्य केले. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
राजू शेट्टी यांच्या आंदोलनानंतर पुन्हा एकदा ऊस उत्पादकांची दिल्लीवारी
राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील ऊस आंदोलनानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्रातील एवढ्या मोठ्या संख्येने ऊस उत्पादक शेतकरी दिल्लीपर्यंत पोहोचले आहेत. सोलापूरसह सांगली, सातारा, अहिल्यानगर आणि राज्यातील विविध भागांतून शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभाग नोंदवत केंद्र सरकारचे लक्ष ऊस उत्पादकांच्या प्रश्नांकडे वेधले.
“दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा” ही भावना महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिली. दिल्लीच्या वेशीवर पोलिसांनी अडवले, स्थानबद्ध केले, मार्ग रोखले; मात्र शेतकऱ्यांचा निर्धार रोखता आला नाही. विविध अडथळे पार करत अखेर महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जंतर-मंतर गाठले आणि आपल्या मागण्यांचा आवाज राजधानीपर्यंत पोहोचवला.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सुरू झालेला हा लढा आता दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचला असून, केंद्र सरकारने या मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी यावेळी केली.
शिवभार : सपकाळ प्रविण, सोलापूर.
*****
... या आहेत ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या !
ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये साखरेची किमान विक्री किंमत (MSP) 50 रुपये किलो करावी, इथेनॉलचा दर 75 रुपये प्रतिलिटर करावा, घरगुती वापरासाठी साखरेचा दर 50 रुपये किलो आणि औद्योगिक वापरासाठी 100 रुपये किलो करावा तसेच साखरेचा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून समावेश वगळावा, यांसह विविध मागण्यांचा समावेश आहे. या मागण्यांचे निवेदन केंद्र सरकारच्या संबंधित विभागांकडे देण्यात आले.

