लक्ष्मीवाडी (आरग) : सांगली जिल्ह्यासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद घटना घडली आहे. संपूर्ण भारत देशातील जिल्हा परिषद शाळेचा एकमेव विद्यार्थी म्हणून जि.प. शाळा लक्ष्मीवाडी (आरग) चा विद्यार्थी कु. राजवर्धन प्रदीप काळे याची दिल्ली येथे निवड झाली आहे.
सध्या भारताची राजधानी दिल्ली येथील भारत मंडपम येथे 12 व्या इन्स्पायर अवॉर्ड (INSPIRE Award) योजनेअंतर्गत वैज्ञानिक साहित्यांचे राष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शन सुरू आहे. या प्रदर्शनात सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 07 वी मध्ये शिकत असणारा (सध्या इयत्ता 10 वी) कु. राजवर्धन प्रदीप काळे हा महाराष्ट्राचे नेतृत्व करत आहे.
वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण भारतातून जिल्हा परिषद शाळेचा तो एकमेव विद्यार्थी आहे. त्यानं बनविलेले वैज्ञानिक साहित्य सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. देशाच्या दृष्टीने जलमार्गात जहाज, बोटी यांना अपघाताची चाहूल लागल्यास ते सुरक्षित कसे राहील, या संकल्पनेवर आधारित बहुउपयोगी असं हे साहित्य त्याने कल्पकतेने बनविलं आहे.
या प्रदर्शनात 06 वी ते 12 वी पर्यंतच्या शाळांचा समावेश आहे. देशभरातून एकूण 750 साहित्य आले असून त्यापैकी 120 साहित्यांची निवड होऊन त्यांना परदेशात जपानला जाण्याची संधी मिळणार आहे.
सांगली जिल्ह्यातून भारत देश पातळीपर्यंत निवड होण्यासाठी पालक प्रदीप काळे सर, विज्ञान शिक्षक सुनिल गावडे सर, मुख्याध्यापक रंगराव पाटील सर यांचे मोलाचं मार्गदर्शन लाभले.
जिल्हा परिषद शाळेचा हा विद्यार्थी सर्वांच्या आशीर्वादाने संपूर्ण भारत देशात आपल्या वैज्ञानिक साहित्याची चमक नक्कीच दाखवणार, असा विश्वास व्यक्त होत आहे.





