ग्रामीण प्रेमकहाणीचा 'धप्पा' येतोय सिनेरसिकांच्या भेटीला

shivrajya patra



नवोदित कलाकारांची सोलापूरकरांना चित्रपट पाहण्याचं आवाहन

ग्रामीण मातीतील निरागस प्रेमकहाणी साकारणारा आगामी मराठी चित्रपट 'धप्पा' येत्या 09 ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होत आहे. चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी 'धप्पा' ची टीम सोमवारी सोलापुरात दाखल झाली. 


यावेळी दिग्दर्शक रविराज लिंबादास वाव्होळे, अभिनेता सागर भंडारे आणि अभिनेत्री प्रतिक्षा अत्राम यांनी पत्रकार परिषदेत प्रसार माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.


'वृंदावन एंटरटेनमेंट अँड फिल्म्स' प्रस्तुत या चित्रपटातून सागर भंडारे आणि प्रतिक्षा अत्राम ही नवी जोडी रुपेरी पडद्यावर पदार्पण करीत आहे. प्रेम, मैत्री, संघर्ष आणि आयुष्यातील अनपेक्षित वळणांवर आधारित ही हृदयस्पर्शी प्रेमकहाणी असल्याचे दिग्दर्शक रविराज वाव्होळे यांनी सांगितले. सोलापूर ही कला आणि संस्कृतीची भूमी असून येथील प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद नेहमीच उत्साहवर्धक असतो, असेही त्यांनी नमूद केले.


चित्रपटातील 'ये दूरिया' हे कव्वाली गीत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या गीताचे संगीत, संगीत संयोजन आणि शब्दरचना रविराज वाव्होळे यांनी केली असून प्रशांत फासगे यांनी म्युझिक प्रोडक्शन केले आहे. राजू नदाफ यांच्या आवाजातील या गीताचे यशराज स्टुडिओमध्ये विजय दयाल यांनी मिक्सिंग व मास्टरिंग केले आहे.

चित्रपटाची निर्मिती सपना ढेरंगे, माधुरी दिवसे आणि सागर भंडारे यांनी केली आहे. विनोद भंडारे, अजित भंडारे आणि शंभु भंडारे हे सहनिर्माते आहेत. कथा, पटकथा व संवाद सागर भंडारे यांचे आहेत. सागर भंडारे आणि प्रतिक्षा अत्राम यांनी सोलापूरकरांचे आभार मानत 09 ऑक्टोबरला 'धप्पा' चित्रपटगृहात जाऊन पाहण्याचे आवाहन केलं. 


या पत्रकार परिषदेत दिग्दर्शक रविराज लिंबादास वाव्होळे, अभिनेता सागर भंडारे, अभिनेत्री प्रतिक्षा अत्राम आणि निलेश वैरागर उपस्थित होते.

To Top