गवंडी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा खा. डॉ. वाघमारे यांच्या हस्ते गौरव
सोलापूर : शिक्षण हे केवळ नोकरी मिळविण्याचे साधन नसून व्यक्तिमत्त्व घडवून समाजाच्या प्रगतीत योगदान देण्याचे प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परिस्थिती कोणतीही असो, ध्येय निश्चित करून सातत्य, मेहनत, शिस्त आणि सकारात्मक विचारांच्या बळावर आपल्या भवितव्याची भक्कम पायाभरणी करावी, असे प्रतिपादन राज्यसभा खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी केले.
गवंडी सगर गवंडी समाज सेवा संघाच्या वतीने किल्लेदार मंगल कार्यालय येथे आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात त्या मार्गदर्शन करताना बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुभाष हिरशेट्टी गुरूजी होते.
याप्रसंगी सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेवक प्रियदर्शन साठे, समाजातील अनिल सगर यांची अधीक्षक अभियंता म्हणून पदोन्नती तसेच अर्जुन हिरशेट्टी आणि देविदास राजापुरे यांच्या सेवा निवृत्तीनिमित्त समाजाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी अर्जुन हिरशेट्टी, देविदास राजापुरे, सिद्धाराम चंद्रपाटले, किशोर पेंडीले, अनुजा बेंजरपे, भारत सगर, आदींची उपस्थिती होती. यावेळी दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
आज मिळालेले यश ही तुमच्या पुढील प्रवासाची सुरुवात आहे. केवळ गुण मिळविण्यावर समाधान न मानता ज्ञान, कौशल्य, संस्कार आणि आत्मविश्वास आत्मसात करा. बदलत्या काळातील तंत्रज्ञानाची कास धरून नवीन संधी ओळखा. स्पर्धा परीक्षा, वैद्यकीय, अभियांत्रिकी, प्रशासन, उद्योग, व्यवसाय, संशोधन यांसह विविध क्षेत्रांत करिअरच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. अपयश आले तरी खचून जाऊ नका; त्यातून शिकून पुन्हा नव्या ताकदीने उभे राहा, असं खा. डॉ. वाघमारे यांनी म्हटले.
विद्यार्थ्यांनी स्वतःच्या यशापुरते मर्यादित न राहता समाजातील गरजू विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व सहकार्य करावे शिक्षणाच्या माध्यमातून पुढील पिढी सक्षम करणे हीच खरी सामाजिक बांधिलकी आहे, असेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानपत्र, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धनंजय सगर, अविनाश बेंजरपे, भीमराव जरते, देविदास सगर, ज्योती हिरशेट्टी यांच्यासह समाजातील पदाधिकारी, कार्यकर्ते आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय राखले यांनी केले तर मार्गरेट सगर यांनी आभार मानले.
