श्री मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात पार पडली आढावा बैठक
सोलापूर : “श्री मार्कंडेय महामुनी रथोत्सव हा पद्मशाली समाजाच्या श्रद्धेचा आणि सोलापूरच्या सांस्कृतिक परंपरेचा महत्त्वाचा उत्सव आहे. या रथोत्सवाची मिरवणूक सुरळीत, सुरक्षित आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावी, यासाठी सोलापूर महानगरपालिका पूर्णपणे कटिबद्ध आहे. मिरवणूक मार्गावरील सर्व आवश्यक नागरी सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्यात येतील.” असं महापौर विनायक कोंड्याल यांनी यावेळी सांगितले.
पद्मशाली समाजाचे कुलदैवत श्री मार्कंडेय महामुनी यांच्या रथोत्सवानिमित्त सोलापूर शहरात निघणाऱ्या भव्य मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध नागरी सुविधा, सुरक्षा व्यवस्था आणि मिरवणूक मार्गावरील आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी आज महापौर कार्यालयात महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीस उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते, शहराध्यक्ष तथा नगरसेविका रोहिणी तडवळकर, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगर अभियंता नीलकंठ मठपती, पद्मशाली संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी, उपाध्यक्ष महांकाली येलदी,सरचिटणीस संतोष सोमा, सहचिटणीस राज महेंद्र कमतम, रमेश कैरमकोंडा, युवक संघटनेचे अध्यक्ष हेमंत कुमार साका, मुख्य अग्निशमन अधिकारी राकेश साळुंखे, कार्यकारी अभियंता विद्युत राजेश परदेशी यांच्यासह महापालिकेचे सर्व विभागीय अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
बैठकीदरम्यान पद्मशाली संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी यांनी श्री मार्कंडेय महामुनी रथोत्सवानिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीची सविस्तर माहिती महापौर, पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांना दिली.
मिरवणूक मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती, ठिकठिकाणी असलेले खड्डे बुजविणे, वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे अडथळे दूर करणे, झाडांच्या वाढलेल्या फांद्या छाटणे, ड्रेनेज लाईनची आवश्यक कामे करणे तसेच विद्युत व अग्निशमन विभागाशी संबंधित आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी फलमारी यांनी यावेळी केली.
रथोत्सवाच्या मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येने भाविक व नागरिक सहभागी होत असल्याने मिरवणूक मार्ग सुरक्षित व अडथळामुक्त असणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने रस्ते, विद्युत व्यवस्था, स्वच्छता, ड्रेनेज, अग्निशमन व्यवस्था तसेच इतर नागरी सुविधांचा समन्वयाने आढावा घेण्यात आला. याप्रसंगी महापौर कोंड्याल बोलत होते.
तसेच महापौरांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना रथोत्सवाच्या मिरवणूक मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून रस्त्यांवरील खड्डे, अडथळे, झाडांच्या फांद्या, ड्रेनेजची समस्या तसेच विद्युत व्यवस्थेशी संबंधित बाबी तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या. कोणत्याही प्रकारचा अडथळा किंवा गैरसोय निर्माण होऊ नये, यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने काम करावे, असंही त्यांनी निर्देशित केले.
महापालिकेच्या वतीने रथोत्सवासाठी आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देतानाच नागरिकांची सुरक्षितता, वाहतूक व्यवस्था आणि मिरवणुकीचे नियोजन यांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले.
यावेळी सभागृह नेते नरेंद्र काळे आणि शहराध्यक्ष तथा नगरसेविका रोहिणी ताई तडवळकर यांनीही आपले मनोगत व्यक्त करत रथोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी महापालिका प्रशासन, पद्मशाली समाजाच्या संस्था आणि संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याची गरज व्यक्त केली. रथोत्सवाची परंपरा आणि उत्सवाचे धार्मिक व सामाजिक महत्त्व लक्षात घेऊन प्रशासनाकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येथील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
बैठकीच्या माध्यमातून रथोत्सवाच्या नियोजनाला गती मिळाली असून, संबंधित सर्व विभागांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्याने श्री मार्कंडेय महामुनी रथोत्सवाची मिरवणूक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी महापालिका प्रशासन सज्ज असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
