अंबाबाई मंदिर परिसरातील अवैध दारू विक्रीविरोधात धरणे आंदोलन ; स्वातंत्र्यदिनी ग्रामस्थांनी थोपटले दंड

shivrajya patra

सोलापूर : सोरेगांव हद्दीतील ए. जी. पाटील कॉलेजजवळ असलेल्या पुरातन अंबाबाई देवी मंदिराच्या परिसरात देशी-विदेशी बनावट दारू तसेच हातभट्टी दारूची विक्री सुरू असल्याचा सोरेगांव ग्रामस्थांचा आरोप आहे. पुरातन अंबाबाई देवी मंदिराचं पावित्र्य आणि महिला भाविकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा विचारात घेऊन ग्रामस्थांनी स्वातंत्र्यदिनी, 15 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या(जुने) प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन करीत देशी-विदेशी बनावट दारू आणि हातभट्टी दारूची विक्रीविरोधात दंड थोपटले. 

अग्रक्रमानं या समस्येचं निराकरण होण्याच्या दृष्टिकोनातून, 12 ऑगस्ट रोजी संबंधित विभागाकडे ग्रामस्थांनी तक्रार नोंदविली,मात्र, अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.

अंबाबाई देवी मंदिरात सोरेगाव, एस.आर.पी. कॅम्प, सैफुल तसेच लोको तांडा परिसरातील भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात. विशेषतः अमावस्या, पौर्णिमा, अष्टमी, मंगळवार व शुक्रवार या दिवशी मंदिर परिसरात महिला, पुरुष तसेच लहान मुलांची मोठी गर्दी होत असते. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावरच अवैधरित्या दारू विक्रीचा व्यवसाय सुरू आहे. 

त्या ठिकाणी मद्यपान करणाऱ्या व्यक्तींकडून महिला भाविकांना अर्वाच्य भाषा वापरणे, गैरवर्तन करणे व त्रास देण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे मंदिर परिसरातील महिला व कुटुंबीयांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या गंभीर बाबींकडे पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागानं गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी पुढं आली असून, काही व्यक्तींकडून भाविकांना दमदाटी केली जात असल्याचा उल्लेख करण्यात आले आहे. 

त्या व्यक्तींविरुद्ध पूर्वी गुन्हे दाखल असल्याचे ग्रामस्थांनी तक्रारीत म्हटले असून, या बाबीची पोलिस प्रशासनाने स्वतंत्रपणे चौकशी करून सत्यता पडताळावी, असंही यावेळी सांगण्यात आलं आहे. “दारू विक्रीचा व्यवसाय बंद होत नाही, तुम्हाला कुठे तक्रार करायची असेल तिथे करा,” अशा प्रकारची मुजोरीची भाषा कर्णपटलावर येत असल्याचंही ग्रामस्थांचं म्हणणं आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर मंदिर परिसरातील अवैध दारू विक्री-हातभट्टी व्यवसायावर तात्काळ कारवाई करून हा व्यवसाय बंद करावा, भाविकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावं आणि संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, या मागणीसाठी स्वातंत्र्यदिनी शनिवारी, 15 ऑगस्ट रोजी सकाळी पूनम गेट येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोरेगाव ग्रामस्थांच्या वतीने एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. 

या आंदोलनास हद्दीतील स्थानिक नगसेवक राजशेखर पाटील, नगरसेवक सत्यजित वाघमोडे, महेश देवकर, अक्षय वाकसे यांनी भेट देऊन या आंदोलनाची पार्श्वभूमी जाणून घेतली. तद्नंतर विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या पोलिस अंमलदार यांनी आंदोलनस्थळी येऊन निवेदन स्वीकारून, त्यावर लवकरात लवकर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. 

प्रशासनाने या आंदोलनकर्त्यांची आणि ग्रामस्थांच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी प्रामुख्यानं यावेळी करण्यात पुढं आली.

धरणे आंदोलनात विश्वनाथ चंदू कारभारी, उमेश शिवगोंडा बिराजदार, नागनाथ रेवनसिद्ध भीमदे, भीमाशंकर भैरप्पा कोरे, कंठप्पा अंबण्णा ख्याडे यांच्यासह सोरेगावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

****

🔴 ... या आहेत प्रमुख मागण्या :

अंबाबाई मंदिर परिसरातील कथित अवैध दारू विक्रीची तात्काळ चौकशी करावी.

⭕ देशी-विदेशी बनावट दारू व हातभट्टी दारू विक्री होत असल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी.

⭕ मंदिर परिसरातील महिला व भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात.

⭕ मंदिर परिसरातील अवैध दारू व्यवसाय कायमस्वरूपी बंद करण्यासाठी प्रशासनाने ठोस कारवाई करावी, अशा प्रमुख मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.

To Top