सर्पदंश वा अपघातग्रस्त रुग्णासंबंधी उपचार सुरू करून नंतर करावी कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण : खासदार प्रणिती शिंदे

shivrajya patra

सर्पदंश झालेल्या चिमुकल्याची खासदार प्रणिती शिंदे यांनी घेतली भेट

सोलापूर : जिल्ह्यात हल्ली सर्पदंशाच्या घटना वाढल्या आहेत. अशा वेळी रुग्णाला तातडीचा उपचार मिळणे अत्यंत महत्त्वाचे असते. सर्पदंश किंवा अपघातग्रस्त रुग्ण आल्यास आधी त्याच्यावर उपचार सुरू करावेत, कागदपत्रांची प्रक्रिया नंतर करावी, अशा सूचना खासदार प्रणिती शिंदे यांनी रुग्णालय प्रशासनाला दिल्या. 

ओपीडी ते अॅडमिशन या प्रक्रियेत वेळ वाया जातो, तो टाळून रुग्णाला थेट अतिदक्षता विभागात दाखल करून उपचार सुरू करावेत, असंही त्यांनी स्पष्ट केले.

मोहोळ तालुक्यातील शिरापूर येथील अकरा वर्षीय समर्थ दत्तात्रय शेंडगे याला बुधवारी दुपारच्या सुमारास शेतात घोणस जातीच्या विषारी सापाने चावा घेतला.  कुटुंबीयांनी त्यास तात्काळ येथील शासकीय रुग्णालयाच्या बी ब्लॉकमध्ये उपचारासाठी दाखल केले. या दुर्घटनेची माहिती मिळताच बालकाच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी खासदार प्रणिती शिंदे यांनी रुग्णालयात धाव घेतली.

यावेळी त्यांच्यासोबत दत्तात्रय शेंडगे, सोनाली शेंडगे, उत्तम काळे, सचिन शितोळे, काँग्रेसचे आयसी ब्लॉक अध्यक्ष देवा गायकवाड, प्रशासन अधिकारी कमलाकर माने, महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या डॉ. शशिकला जगताप आणि पत्रकार कृष्णकांत चव्हाण यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

खासदार शिंदे यांनी डॉक्टरांशी चर्चा करून सुरू असलेल्या उपचारांची माहिती घेतली आणि शेंडगे कुटुंबीयांना धीर दिला.

पावसाळ्यात बिळांमध्ये पाणी शिरल्याने साप बाहेर पडतात, त्यामुळे धोका अधिक असतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी शेतात काम करताना योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन खासदार शिंदे यांनी यावेळी केले.

****

To Top