15 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट जलसंधारण सप्ताह; 'Save Soil, Save Water, Secure omorrow' हा यंदाचा नारा
"घोषवाक्य-पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा"
सोलापूर : महाराष्ट्र शासनाने जलसंधारणाला लोकचळवळ बनविण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात *15 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट 2026* दरम्यान *जलसंधारण सप्ताह* आणि *15 ऑगस्ट 2026 ते 26 जानेवारी 2027* पर्यंत *जलसंधारण अभियान* राबविण्यात येणार आहे. यामध्ये जनजागृती, युवकांचा सहभाग आणि शाश्वत विकासासाठी मृद व जलसंधारणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणा तसेच स्वयंसेवी संस्थांनी यात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित जलसंधारण दिन व जलसंधारण सप्ताह आयोजनाच्या अनुषंगाने पूर्व तयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कार्तिकेयन मार्गदर्शन करत होते.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, जिल्हा जलसंधारण अधिकारी राहुल क्षीरसागर, उपविभागीय अधिकारी माढा जयश्री आव्हाड, उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, सदाशिव पडदुने, विजया पांगरकर, सुमित शिंदे, अमित माळी, स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी दत्तात्रय खराडे, अमोल कारंडे यांच्यासह जलसंधारण विभागाचे सर्व अधिकारी तसेच जलसंधारणात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्तिकेयन म्हणाले की, या अभियानाची संकल्पना *'Save Soil, Save Water, Secure Tomorrow'* अशी असून घोषवाक्य *"पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा"* हे आहे. विद्यार्थी, अधिकारी, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, खेळाडू आणि सर्व नागरिकांनी यात सहभागी व्हावे. हे अभियान सोलापूर जिल्ह्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. आपल्या जिल्ह्यात कमी प्रमाणात पाऊस पडत असल्याने जलसंवर्धनाचे महत्त्व खूप मोठे आहे. शासनाने दिलेल्या सूचनेप्रमाणे किंवा त्यापेक्षा अधिक मोठ्या प्रमाणात काम करून सोलापूर जिल्हा या अभियानात अग्रेसर राहील या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले.
या अभियानात शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी होतील या दृष्टीने शिक्षण विभागाने प्रयत्न करावेत. शासनाचा उद्देश युवकांच्या सहभागातून जलसंधारण चळवळ गावागावापर्यंत पोहोचविणे हा आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवावर्ग या अभियानात सहभागी होऊन आपल्या जिल्ह्याच्या प्रत्येक गावात जलसंधारण चळवळ जाऊन ती गावे पाणीदार होतील यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी केले.
प्रारंभी जलसंधारण अधिकारी राहुल क्षीरसागर यांनी जलसंधारण विभागाने जलसंधारण दिन व जलसंधारण सप्ताह संपूर्ण जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात राबवण्याबाबत दिलेल्या सूचनाबाबत माहिती बैठकीत सादर केली.
यामध्ये महसूल विभाग जलसंधारण विभाग क्रीडा विभाग शिक्षण विभाग स्वयंसेवी संस्था यांनी या सप्ताहाच्या यशस्वी आयोजनासाठी करावयाच्या कामांची माहिती दिली. तसेच 15 ऑगस्ट रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याकडून सर्वांना या निमित्त शपथ दिली जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
आठवडाभर चालणारे प्रमुख उपक्रम
1. महा वॉकेथॉन
दि. 21 ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये 3 किमीची वॉकेथॉन होणार आहे. यामध्ये सहभागींना शपथग्रहण, ई-प्रमाणपत्र, टी-शर्ट व बॅज देण्यात येणार आहे.
2. Reel स्पर्धा
दि. 15 ते 19 ऑगस्ट दरम्यान युवक-युवतींसाठी Instagram वर 30 ते 60 सेकंदांची Reel स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. जिल्हास्तरावर प्रथम क्रमांकासाठी ₹25,000, द्वितीय ₹15,000 आणि तृतीय ₹10,000 असे रोख पुरस्कार दिले जाणार आहेत.
3. शालेय व महाविद्यालयीन उपक्रम
निबंध, चित्रकला, वादविवाद स्पर्धा, शोषखड्डा निर्मिती उपक्रम राबविले जातील. तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शाळा व महाविद्यालयांना 26 जानेवारी रोजी पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येईल. यावेळी जलमित्र/जलदूत म्हणूनही निवड केली जाईल.
4. क्षेत्रीय कार्यक्रम
या काळात वृक्षारोपण, अमृत सरोवरांना भेट, नाला आणि तलाव स्वच्छता, शेततळे व बंधारे यांची पाहणी यांसारखे उपक्रम राबविले जाणार आहेत. या संपूर्ण अभियानात प्रत्येक नागरिकाने *"माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा"* ही शपथ घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
अभियानाच्या प्रसिद्धीसाठी #MahaWalkathon #WalkForWater #SaveSoilSaveWater हे सोशल मीडिया हॅशटॅग वापरण्यात येणार आहेत.
***
