युवकांनी सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतल्यास समाजाच्या प्रगतीला निश्चितच मिळेल चालना : प्रा. जैनोद्दीन पटेल यांचा विश्वास
आजच्या युवकांनी आपल्या ज्ञानाचा व कौशल्यांचा उपयोग समाजाच्या आणि देशाच्या प्रगतीसाठी करावा : अध्यक्षीय भाषणात प्राचार्य प्रा. डॉ. इ. जा. तांबोळी यांचं आवाहन
सोलापूर : युवकांमध्ये प्रचंड ऊर्जा, सर्जनशीलता आणि परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता असून, या क्षमतेचा सकारात्मक वापर समाज व राष्ट्राच्या विकासासाठी झाला पाहिजे. युवकांनी आपल्या क्षमता ओळखून कौशल्यविकास, नेतृत्वगुण आणि सामाजिक बांधिलकी जोपासत समाजकार्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन प्रा. जैनोद्दीन पटेल यांनी केले.
सोलापूर सोशल असोसिएशन्स् आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, सोलापूर येथे बुधवारी, 12 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय युवा दिन 2026-27 साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात प्रा. जैनोद्दीन पटेल प्रमुख पाहुणे म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. इ. जा. तांबोळी होते.
संयुक्त राष्ट्र संघटनेने, 12 ऑगस्ट हा दिवस आंतरराष्ट्रीय युवा दिन म्हणून घोषित केला असून, जगभरातील युवकांच्या समस्या, त्यांची क्षमता, त्यांच्यासमोरील आव्हाने तसेच राष्ट्रनिर्माणातील त्यांचे योगदान याबाबत जागरूकता निर्माण करणे, हा या दिनाचा प्रमुख उद्देश आहे. याच पार्श्वभूमीवर महाविद्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. डी. एस. नारायणकर यांनी केले. त्यांनी आंतरराष्ट्रीय युवा दिनाचा इतिहास, त्याचे महत्त्व आणि आजच्या काळातील युवकांची भूमिका यावर प्रकाश टाकला. युवक हे राष्ट्राच्या विकासाचे महत्त्वाचे घटक असून, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक संस्थांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रमुख पाहुणे प्रा. जैनोद्दीन पटेल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना युवकांनी स्वतःमधील सुप्त गुण व क्षमता ओळखून त्यांचा विकास करण्याची गरज व्यक्त केली. केवळ शैक्षणिक ज्ञान न घेता विद्यार्थ्यांनी विविध कौशल्ये आत्मसात करावीत, नेतृत्वगुण विकसित करावेत आणि समाजातील विविध प्रश्नांबाबत संवेदनशील राहावे, असे त्यांनी सांगितले. युवकांनी सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतल्यास समाजाच्या प्रगतीला निश्चितच चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी मुसा बागवान आणि अल्फिया मोमीन या विद्यार्थ्यांनीही आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले. युवकांची बदलत्या समाजातील भूमिका, शिक्षणातून मिळणाऱ्या संधी आणि राष्ट्रनिर्माणात युवकांचे योगदान याविषयी त्यांनी आपले विचार मांडले.
युवकांनी सकारात्मक विचारसरणी ठेऊन आपल्या ज्ञानाचा व कौशल्यांचा उपयोग समाजाच्या विकासासाठी करावा, असा संदेश उभयतांनी त्यांच्या मनोगतातून दिला.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य प्रा. डॉ. इ. जा. तांबोळी यांनी युवाशक्ती ही राष्ट्राची मोठी संपत्ती असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच सामाजिक जाणीव, शिस्त, जबाबदारी आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित करावा. आजच्या युवकांनी आपल्या ज्ञानाचा व कौशल्यांचा उपयोग समाजाच्या आणि देशाच्या प्रगतीसाठी करावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आर. वाय. मिर्झा यांनी तर प्रा. डॉ. डी. एस. नारायणकर यांनी आभार मानले.
