महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघर्ष कृती समिती च्या वतीने ठिय्या आंदोलन
सोलापूर : उजनी धरणामध्ये सौर उर्जा प्रकल्प व मासेमारीचा खाजगी ठेका प्रक्रिया प्रस्तावित असून ती रद्द करण्याच्या मागणीसाठी बुधवारी, 12 ऑगस्ट 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय (जुने) प्रवेशद्वारासमोर (पुनम गेट) येथे महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघर्ष कृती समिती च्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रशासकीय लाभक्षेत्र विकास प्राधिकरण कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
उजनी जलाशयाचा पाणीसाठा 30, 000 हेक्टर आहे. धरणाच्या सभोवतालच्या परिसरातील हजारो मच्छिमार, आडतदार, व्यापारी, मत्स्यकारी यांची उपजिविका ही मत्स्य व्यवसायावरच अवलंबून आहे. राज्य सरकारने मत्स्य व्यवसायाला कृषिचा दर्जा दिला असून मच्छिमारांचे जीवनमान उंचावणे हा उद्देश असल्याने २००८ ला मुंबई उच्च न्यायलयाने ही परवाना पासेसवरच ठेवण्याचे आदेश जलसंपदा विभागास दिले होते, परंतु पासेस घेणे, हे त्या खात्याचे काम असून पासेस घेण्याबाबत कोणीही आजवर विरोध केला नाही.
या धरणावरील प्रस्तावित सौर उर्जा प्रकल्पामुळे मानवी जीवन आणि पर्यावरणावरही त्याचा विपरीत परिणाम होणार आहे. हा प्रकल्प 14, 976 कोटी रुपयांचा आहे. तो 1, 000 मेगा वॅटचा असून त्यात 10, 000 हेक्टर क्षेत्र व्यापले जाणार असल्याने त्यामुळे मोठ्या प्रमाणात रेडियशनने धरण परिसरातील लोकांना कॅन्सरसारख्या आजाराचा धोका निर्माण होऊ शकतो, अशी भिती व्यक्त केली जातेय.
धरणातील पाणीसाठा प्रतिवर्ष 70 टक्के कमी होत असल्याने उर्वरित राहिलेल्या पाणी साठ्यामध्ये सौर उर्जा सारखा प्रकल्प उभा राहिल्यास मासेमारी करण्यास जागा शिल्लक राहणार नाही, असं महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघर्ष कृती समिती चं मत आहे.
मासेमारीचा खाजगी ठेका आणि सौर उर्जा प्रकल्पामुळे हजारो मच्छिमार, व्यापारी, अडतदार, मत्स्यकारी यांची कुटुंब उद्धवस्त होऊन जातील, या प्रकल्पामुळे पाण्यातील व परिसरातील प्राणी, जीवजंतू संपुष्टात येऊन पाण्याची गटारगंगा होऊन प्रदुषणात प्रचंड प्रमाणात वाढ होऊन वेगवेगळी रोगराई उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं संघर्ष कृति समितीच्या आंदोलनाचं नेतृत्व करीत असलेल्या पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.
यापूर्वीही खाजगी अनेक ठेकेदारास धरणाचा ठेका दिला होता, परंतु वरील बाबींनुसारच परिस्थिती घडली होती. त्यामुळे मच्छिमार, व्यापारी, आडतदार, मत्स्यकारी आणि ठेकेदार यांच्यात संघर्ष निर्माण होऊन अराजकता होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मासेमारीचा खाजगी ठेका व सौर उर्जा प्रकल्प राबविल्यास तशीच परिस्थिती सद्यस्थितीला निर्माण होऊ शकते.
या ठिय्या आंदोलनाचा विचार करुन सौर उर्जा प्रकल्प आणि मासेमारीचा खाजगी ठेका रद्द करावा, अशी विनंतीही या निवेदनात करण्यात आलीय. या आंदोलनात राज्य मच्छीमार संघर्ष कृती समितीचे राज्यभरातून आलेले पदाधिकारी, सभासद आणि मच्छीमारीवर अवलंबून असलेले मच्छीमार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
... या आहेत प्रमुख मागण्या :
1) सौर उर्जा प्रकल्प तत्काळ रद्द करावा.
2) मासेमारीचा ई टेंड्रिंग चाचपणी खाजगी ठेका तत्काळ रद्द करावा.
3) उजनी जलाशयातील मासेमारी परवाना पासेस पुर्वरत चालू ठेवावे.
4) आपल्या खात्याकडुन परवाना पासेस जमा करणे व्यवस्थापना अभावी होत नसल्यास मासेमारीचे हक्क मत्स्यविभागास हस्तांतर करावे.
मासेमारीचा खाजगी ठेका गेल्यास वाढणार ठेकेदाराची मनमानी !
उजनी धरणाचा मासेमारीचा खाजगी ठेका गेल्यास ठेकेदाराची मनमानीप्रमाणे पकडलेले सर्व मासे त्याने ठरवेल, त्या दराने द्यावे लागतील. मच्छिमार, आडतदार, व्यापारी, मत्स्यकारी यांचा हा व्यवसाय धोक्यात येईल. त्यातून स्थानिक वातावरण दुषित तयार होऊन गुन्हेगारी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
*
