अन्यायग्रस्त शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या व्यथा मेळाव्यात मांडल्या; संस्थाचालकांच्या मनमानीविरोधात बहुजन महासंघ आक्रमक !

shivrajya patra

मंद्रुप (दक्षिण सोलापूर) : महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाचा दक्षिण सोलापूर तालुका मेळावा गुरुवारी, महात्मा फुले विद्यालय, मंद्रूप येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या मेळाव्यात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः अन्यायग्रस्त शिक्षक-कर्मचाऱ्यांनी आपल्या व्यथा, अडचणी आणि संस्थात्मक पातळीवर होत असलेल्या अन्यायाची माहिती पदाधिकाऱ्यांसमोर मांडली.

महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाचा दक्षिण सोलापूर तालुका मेळाव्याचं उद्घाटन राज्य सरचिटणीस प्राचार्य बोधीप्रकाश गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर होते.

यावेळी राज्य उपाध्यक्ष निलकंठ शिंगे, राज्य उपाध्यक्ष प्राचार्य प्रकाश शिंदे, जिल्हाध्यक्ष प्रा. युवराज भोसले, जिल्हा सहसचिव डॉ. राजदत्त रासोलगीकर, दक्षिण तालुका अध्यक्ष दत्तात्रय शिंदे, दक्षिण तालुका सरचिटणीस राम गायकवाड यांच्यासह महासंघाचे पदाधिकारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अन्यायग्रस्त शिक्षकांनी मांडल्या व्यथा

मेळाव्यात दक्षिण सोलापूर तालुक्यासह परिसरातील विविध शाळा-महाविद्यालयांमध्ये काम करणाऱ्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या समस्या मांडल्या. सेवा विषयक अडचणी, संस्थात्मक पातळीवरील निर्णय, प्रलंबित प्रश्न तसेच अन्यायकारक वागणुकीमुळे निर्माण झालेल्या अडचणींचा पाढाच काही कर्मचाऱ्यांनी यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांसमोर वाचला.

अन्याय सहन करणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, आपल्या प्रश्नांना न्याय मिळण्यासाठी महासंघाने ठामपणे पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना विचारपीठ उपलब्ध करून देणारा हा मेळावा ठरला. "बहुजनांच्या हक्कासाठी व अस्तित्वासाठी" या ध्येयाने महासंघाचा लढा अधिक व्यापक करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

यावेळी राज्य संघटक अभिजीत भंडारे, मोहोळ तालुका अध्यक्ष शिवाजी जगताप, अक्कलकोट तालुका अध्यक्ष गंगाधर शिवशरण, उत्तर तालुका अध्यक्ष नितीन गायकवाड, प्रिया कदम, प्रा. अनुराधा पाटील , प्रा.माळी मॅडम, संदीप निस्ताने, सिद्धेश्वर भुरले, दक्षिण तालुक्यातील सभासद बालाजी भडकुंबे, इरप्पा राऊतराव, सोमनाथ साळुंखे, म्हाळाप्पा वडरे, योगेश जोकारे, चंद्रमणी वाघमारे, दीपक कांबळे, एकोराम चौगुले, महबूब तांबोळी, शिवानंद चौगुले, विजय गायकवाड (माळकवठे), आसिफ कंदलगावकर, पतंगे उर्दू शाळा मंद्रूप, इरफान शेख आदी उपस्थित होते.

***

संस्थाचालकांच्या मनमानीविरोधात महासंघाचा इशारा :प्रदेशाध्यक्ष अण्णासाहेब भालशंकर

यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर अन्याय करणाऱ्या काही संस्थाचालकांच्या वाढत्या मनमानीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. 

शिक्षक आणि कर्मचारी हे शिक्षण व्यवस्थेचे महत्त्वाचे घटक असून, त्यांच्या हक्कांवर गदा आणण्याचा कोणालाही अधिकार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.

"शिक्षक-कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असेल तर महासंघ गप्प बसणार नाही. अन्यायग्रस्तांच्या पाठीशी संघटितपणे उभे राहून त्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी कायदेशीर व प्रशासकीय पातळीवर संघर्ष केला जाईल," असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

शिक्षकांच्या प्रश्नांकडे केवळ कर्मचारी म्हणून न पाहता त्यांच्या सेवासुरक्षेचा आणि सन्मानाचा विषय म्हणून पाहण्याची गरज असल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले.

***


To Top