'विकसित भारत रोजगार व आजीविका हमी मिशन ग्रामीणचा (ग्रामीण)'चा जिल्ह्यात शुभारंभ

shivrajya patra

 
 ग्रामीण विकासाला मिळणार नवी दिशा

सोलापूर/02 : भारत सरकारच्या 'विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियान (ग्रामीण)' (VBRAG) अधिनियम-2025 ची राज्यात 01 जुलै 2026 पासून अंमलबजावणी सुरू झाली असून, सोलापूर जिल्ह्यात या अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात उत्साहात पार पडला.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) सूर्यकांत भुजबळ यांच्या नेतृत्वात या अभियानाच्या अंमलबजावणीस प्रारंभ करण्यात आला.

कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष दिपक वैद्य, जिल्हा परिषद उपाध्यक्ष अर्थ व बांधकाम समितीचे सभापती इंद्रजित पवार, शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार उपजिल्हाधिकारी (रोहयो), जिल्हा परिषदेचे सभापती व सदस्य, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी, नरेगा विभागाचे अधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून तसेच अभियानाच्या माहिती फलकाचे उद्घाटन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

या अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील स्थलांतर कमी करून स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देणे, जलसंधारण व जलसुरक्षा, ग्रामीण पायाभूत सुविधा, उपजीविका आधारित विकासकामे तसेच आपत्ती प्रतिबंधक कामांना गती देण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागात टिकाऊ विकासास चालना मिळणार असल्याचे उपजिल्हाधिकारी अंजली मरोड (रोहयो) यांनी सांगितले.
जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी प्रत्यक्ष क्षेत्रात कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या योगदानाचे कौतुक करत, मनरेगा योजनेप्रमाणेच या नव्या अभियानातही सर्वांनी समन्वयाने काम करून ग्रामीण विकासाला गती द्यावी, असं आवाहन केले.

कार्यक्रमात हणुमंत कादे यांनी पीपीटीद्वारे अभियानाची सविस्तर माहिती दिली. रोहयो योजनेतील यशोगाथांचे सादरीकरण सुरवसे, जिल्हा सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, रोहयो शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर यांनी केले. 

सूत्रसंचालन जाधव यांनी केले, तर अरुण वाघमोडे, गटविकास अधिकारी (नरेगा) यांनी उपस्थितांचे आभार मानले.

... चौकट ...

ग्रामीण भागात जनजागृती करून विकास कामांना प्राधान्य : अध्यक्ष दिपक वैद्य

या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषदेसह सर्व यंत्रणा समन्वयाने कार्य करतील, तसेच ग्रामीण भागात जनजागृती करून विकास कामांना प्राधान्य दिले जाईल, असं जिल्हा परिषद अध्यक्ष दिपक वैद्य यांनी यावेळी सांगितले.

To Top