जिजाऊ ब्रिगेडच्या पुणे विभागीय अध्यक्षा प्रा. डॉ. मीनाक्षी जगदाळे आणि त्यांच्या टीमचा स्तुत्य उपक्रम
सोलापूर : जिल्ह्यातील टेंभुर्णी (तालुका माढा) येथे वट पौर्णिमेच्या सणाचे औचित्य साधून अनेकदा परंपरेनुसार पूजेसाठी झाडांच्या फांद्या तोडल्या जातात. मात्र, या प्रथेला फाटा देत निसर्ग संवर्धनाचा एक नवा आणि आदर्श पायंडा जिजाऊ ब्रिगेडच्या पुणे विभागाच्या वतीने पाडण्यात आला आहे. 'झाडांच्या फांद्या न तोडता, नवीन झाडे लावा' असा महत्त्वपूर्ण व विधायक संदेश देत, तसेच 01 जुलै कृषि दिनाचं औचित्य साधून जिजाऊ ब्रिगेड, पुणे विभागीय अध्यक्षा प्रा. डॉ. मीनाक्षी अमोल जगदाळे आणि त्यांच्या टीमच्या वतीने भव्य वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली.
01 जुलै हा दिवस माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्तानं महाराष्ट्रात कृषि दिन म्हणूनही ओळखला जातो. या दिवसाचे आणि वटपौर्णिमेचे महत्त्व एकत्र जपत हा अनोखा उपक्रम आयोजित करण्यात आला. 
पर्यावरणाचा ढासळत चाललेला समतोल राखण्यासाठी केवळ वृक्षारोपण करणे पुरेसे नसून, लावलेली झाडे जगवणे आणि त्यांचं संवर्धन करणे तितकेच महत्त्वाचे आहे, ही बाब या मोहिमेदरम्यान अधोरेखित करण्यात आली.
यावेळी परिसरामध्ये विविध देशी वृक्षांच्या रोपांची लागवड करण्यात आली. केवळ रोपे लावून न थांबता, उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी या लावलेल्या झाडांचे पुढील काळात संगोपन करण्याची आणि त्यांना जगवण्याची जबाबदारीही स्वीकारली
सणांच्या नावाखाली होणारी वृक्षांची हानी थांबवून, प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी झाड लावून ते जगवण्याचा संकल्प करावा, असं आवाहन सौ. सुवर्णा भोसले यांनी यावेळी केले. 
या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती शीला पाटील, उपाध्यक्ष सौ. सुवर्णा भोसले, संघटक सारिका महाडीक, सौ. सुप्रिया भोसले, सौ. सविता जगताप, सौ. कुसुम फाळके, सौ. विद्या धनवे यांच्यासह अन्य महिला सदस्य उपस्थित होत्या. सर्वांनी या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले. ठिकठिकाणी झाडे लावली.
जिजाऊ ब्रिगेडच्या या पर्यावरणपूरक आणि स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरांतून आणि पर्यावरणप्रेमी नागरिकांकडून मोठे कौतुक होत आहे. या विधायक कार्यामुळे समाजासमोर एक अतिशय सकारात्मक आणि अनुकरणीय आदर्श निर्माण झाला असल्याचं दिसून आलं आहे.
... चौकट ....
"निसर्गाप्रती खरी कृतज्ञता जपली पाहिजे"
“सण आणि उत्सव साजरे करताना निसर्गाची हानी होणार नाही, याची काळजी घेणे ही आता काळाची गरज आणि आपली सामुहिक जबाबदारी आहे. पूजेसाठी झाडांच्या फांद्या तोडून पर्यावरणाचे नुकसान करण्याऐवजी, आपण सर्वांनी नवीन झाडे लावून निसर्गाप्रती आपली खरी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे."
- श्रीमती शीला पाटील (ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या)
