सोलापूर : जिल्ह्यात सर्वत्र पाऊस सुरू आहे. सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसात दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगांव-उळेगांव रस्त्यावरील पूलावर आलेल्या पाण्यामुळे पहाटेपूर्वीपासून या मार्गावरची वाहतूक खंडित झालीय. त्यामुळे पैलतीरावर माध्यमिक शाळा असल्याने या विद्यार्थ्यांच्या शाळेला जाण्यावर पाणी पडणार असल्याचं दिसतंय. 
कासेगांवहून उळेगांव अन् सोलापूर शहराला जोडणारा महत्वाचा मार्ग अशी या रस्त्याची ओळख आहे. दोन वर्षापूर्वी ह्या रस्त्यावरील नव्यानं बांधण्यात आलेल्या पुलाचं नियोजन फसल्यानं नवा पूल पूर्वीपेक्षा जवळपास 06 फुटाहून अधिक खड्ड्यात गेल्याचं दिसतंय. हल्ली थोडाही पाऊस आला की, पूलावर पाणी येणं ही नेहमीचीचं बाब बनलीय.
गतवर्षी पावसाळ्यात या पूलावर आलेल्या पाण्याच्या पूरात एक तरुण वाहून गेल्यानं गेल्यावर त्याचं शव तीन दिवसानंतर हाती लागलं होतं. तेव्हा लोकप्रतिनिधींच्या आश्वासनाप्रमाणं कोटी-कोटीच्या नव्या पूलाला मंजुरी असल्याचं म्हटलं जातंय, मात्र त्याच्या मुहुर्ताच्या प्रतीक्षेत आजही कासेगांव ग्रामस्थ आहेत.
हल्ली थोडा ही पाऊस झाला की, कासेगांवच्या या बहुचर्चित पूलावर पाणी येऊन दिवसभराची वाहतुक विस्कळीत होते. त्याचा सामान्य नागरिकांना दैनंदिन कामासाठी फटका बसतोच, त्याचवेळी पैलतीरावर असलेली बॅ. बाबासाहेब भोसले प्रशाला आणि शहरातील अन्य विद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शाळेवरही पाणी पडण्याची शक्यता आहे. या ग्रामस्थांना बिरोबा देवस्थान वस्ती, गंगेवाडी दगडखाणी मार्गे सोलापूर-तुळजापूर महामार्गाला यावं लागणार आहे.
