निमित्त कृषि दिनाचं...! जिल्हा परिषदेत शेतकरी आणि उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

shivrajya patra

आधुनिक शेतीसाठी तज्ज्ञांचं मार्गदर्शन

सोलापूर : स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषि विभाग, महाराष्ट्र शासन, आत्मा सोलापूर व जिल्हा परिषद सोलापूर, कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी, कृषि दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित कार्यक्रमास लोकप्रतिनिधी, अधिकारी, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ कृषी तज्ज्ञ, कृषी निविष्ठा विक्रेते आणि जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, कृषि व पशुसंवर्धन, दुग्धशाळा समितीचे सभापती रामप्पा चिवडशेट्टी, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अॅड. अमृता वाघे, जिल्हा परिषद सदस्य नेताजी खंडागळे, शिवमूर्ती सिद्धाराम, लखन साहेब, कुमार काळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मिनाक्षी वाकडे, आत्मा सोलापूरचे प्रकल्प संचालक कांताप्पा खोत, शुक्राचार्य भोसले, कृषि विकास अधिकारी हरिदास हावळे, उपविभागीय कृषि अधिकारी देवेंद्र ढगे तालुका कृषि अधिकारी दक्षिण सोलापूर अवधूत मुळे, तालुका कृषि अधिकारी उत्तर सोलापूर, रामचंद्र माळी व त्यांचे अधिनस्त सर्व अधिकारी कर्मचारी विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी आत्मा सोलापूरचे प्रकल्प संचालक कांताप्पा खोत यांनी प्रास्ताविक करत कृषि दिनाचे महत्त्व, कृषि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना आणि शेतकरी कल्याणासाठी सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.

यावेळी राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय पीक स्पर्धेत यश संपादन केलेल्या शेतकऱ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी स्वावलंबन योजना अंतर्गत लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांचाही गौरव करण्यात आला. 

कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना वृक्ष रोप, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. याचबरोबर कृषि विभागात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शासनाच्या कृषि योजनांची प्रभावी अंमलबजावणी, शेतकरी हितासाठी केलेले उल्लेखनीय कार्य आणि उत्कृष्ट प्रशासकीय सेवेसाठी त्यांचा गौरव करण्यात आला. 

जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी मार्गदर्शन करताना प्रगतशील शेतकऱ्यांनी इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून प्रगत तंत्रज्ञानाच्या प्रसारामध्ये योगदान देणे बाबत आवाहन केले.

कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते म्हणून सोलापूर कृषि विज्ञान केंद्राचे विषय विशेष तज्ज्ञ अमोल शास्त्री यांनी " एल निनो काळात आपत्कालीन पीक व्यवस्थापन व सोयाबीन व तूर लागवडीची पंचसूत्री तसेच खरीप हंगामाचे नियोजन" या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. बदलत्या हवामानात आधुनिक शेती पद्धती, पीक व्यवस्थापन, उत्पादनवाढ आणि शाश्वत शेतीबाबत त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी उपस्थित शेतकऱ्यांना कृषी दिनाच्या शुभेच्छा देत, कृषी क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी शासनाच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले.

महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अॅड.अमृता वाघे यांनी मार्गदर्शन करताना अमृता वाघे म्हणाल्या, "एक राजा राज्य चालवतो, पण एक शेतकरी संपूर्ण देश चालवतो." शेतकरी हा देशाचा अन्नदाता असून त्याच्या कष्टामुळे प्रत्येकाच्या ताटात अन्न पोहोचते. त्यामुळे शेती हा केवळ व्यवसाय नसून देशाच्या अर्थव्यवस्थेचा आणि विकासाचा भक्कम आधार आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्याण श्रावस्ती यांनी केले, तर कृषी विकास अधिकारी हरिदास हावळे यांनी उपस्थित मान्यवर, अधिकारी, कर्मचारी व शेतकरी बांधवांचे आभार मानले. 

कार्यक्रमास कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, आत्मा सोलापूरचे अधिकारी, कर्मचारी तसेच जिल्ह्यातील विविध भागांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

... चौकट

जिल्हा परिषद शेतकऱ्यांच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध राहील," : अध्यक्ष दीपक वैद्य

"मी स्वतः एक शेतकरी आहे. शेतकऱ्यांच्या कष्टाची, वेदनेची आणि तळमळीची मला पूर्ण जाणीव आहे. शेतकरी समृद्ध झाला, तरच देशाची खरी प्रगती होईल. जिल्हा परिषद शेतकऱ्यांच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध राहील," असे सांगत समारोपाच्या भाषणात जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य यांनी शेतकरी बांधवांना कृषि दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

To Top