बनावट शिंदी-ताडी, फ्रुट बिअर, मावा आणि हातभट्टी दारूकडं अन्न व औषध प्रशासनाचा कानाडोळा; उपोषण सुरू

shivrajya patra

सोलापूर : शहरात अनेक ठिकाणी बनावट शिंदी-ताडी, फ्रुट बिअर, मावा आणि हातभट्टी दारू विकण्याकडं अन्न व औषध प्रशासन सहेतुकपणे कानाडोळा करीत असल्यानं अवैध व्यवसायिकांचं पेव फुटलं आहे. अशा धंद्यांमुळं तरुणाई व्यसनाधिनतेच्या गर्तेत लोटली जात आहे. शहरातील बेकायदेशीर धंदे बंद करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर RTI व आणि सामाजिक कार्यकर्ता सिध्दाराम नंदरगी यांनी बुधवारपासून उपोषण सुरू केलं आहे.

येथील सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन यांच्या कार्यकक्षेत शहरातील विविध ठिकाणी रसायनयुक्त ताडी, हातभट्टी, बनावट शिंदी, मावा अन्य नशेली पदार्थ विकण्याचे धंदे जोमात सुरू आहेत. या अवैध साखळीकडं त्या कार्यालयाचे अधिकारी जाणुन-बुजून दुर्लक्ष करीत असल्याचा पदोपदी प्रत्यय येत आहे. अन्न व औषध प्रशासनाची जणू त्यास मूक संमती असल्याचा घणाघाती आरोप येथील अनेक सामाजिक संघटनांनी वेळोवेळी केला आहे.

समाजसेवी संस्था, संस्थांचे पदाधिकारी आणि समाजसेवकांनी, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस आयुक्त कार्यालय, आणि पुणे येथील सह. आयुक्त अन्न व औषध प्रशासन कार्यालय यांना अनेक वेळी लेखी व तोंडी तक्रारी दिलेल्या आहेत, त्यात सिध्दाराम नंदरगी यांच्या अर्जाची भर पडलीय.

मागील 2 वर्षात देसाई यांनी मावा, गुटखा, फ्रुट बिअर, शिंदी व विविध मोठ-मोठ्या खाद्यपदार्थ व पेय पदार्थ तयार करणाऱ्यांकडून मर्जीतील खाजगी व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते आणि झिरो पत्रकारांना वसुलदार म्हणून नेमले असल्याचंही बोललं जात आहे.

येथील अन्न व औषध प्रशासन कार्यालय, तेथील निरीक्षक शासनाच्या डोळ्यात धूळ फेकणारी एक स्वतंत्र यंत्रणा तयार झालेली आहे. कारवाईच्या नावाखाली केवळ वसुलीच चालते, नमुने (शॅम्पल) घेऊन तडजोड केली जाते, असा नंदरगी यांचा आरोप आहे. अनेक घटना काही पत्रकारांनी उघडकीस आणलेल्या आहेत, त्यामुळं या आरोपाला बळ मिळतं.

या भ्रष्ट काराभाराविरोध आम्ही सामाजिक भान ठेऊन कर्तव्याशी अप्रामाणिक असलेल्या देसाई यांची सोलापूर जिल्ह्यातून तात्काळ हकालपट्टी करावी अन् त्यांनी तयार केलेलं वसुलीचं नेटवर्क तात्काळ उध्दवस्त करावं, या मागणीसाठी सिध्दाराम  नंदरगी यांनी,01 जुलै रोजीपासून जिल्हाधिकारी कार्यालय, पुनम गेट इथं बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलं आहे. 

या आंदोलनाची तात्काळ दखल न घेतली गेल्यास पुढील आठवड्यात आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन/अन्न त्याग आंदोलन (उपोषण) करण्यात येणार असल्याचा इशाराही नंदरगी यांनी दिला आहे. 

To Top