माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक जयंतीनिमित्त गुणवंत विद्यार्थी, कृषिरत्न शेतकरी, सेवानिवृत्त आणि पदोन्नतीप्राप्त अधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात
सोलापूर : तुम्ही मिळवलेलं यश हे समाजासाठी प्रेरणा आहे. आपल्यातच उद्याचे अधिकारी, नेते, उद्योजक, संशोधक आणि समाजसेवक दडले आहेत. आज तुम्ही सत्कार घेता आहात, उद्या तुम्ही दुसऱ्याचा सत्कार कराल, अशी कामगिरी करा असं आवाहन माजी सहाय्यक आयुक्त तथा विशेष कार्यकारी अधिकारी प्रकाश राठोड यांनी केले.
माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक जयंतीनिमित्त,01 जुलै रोजी विजापूर रस्त्यावरील द्वारकाधीश मंदिर हॉलमध्ये सोलापूर शहर-जिल्ह्यातील बंजारा समाजातील गुणवंत विद्यार्थी, कृषिरत्न शेतकरी व सेवानिवृत्त/पदोन्नतीप्राप्त अधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा माजी सहाय्यक आयुक्त तथा विशेष कार्यकारी अधिकारी प्रकाश राठोड यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
60 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व करिअर मार्गदर्शन - इयत्ता 10 वी/12 वी परीक्षेत 70 टक्क्यापेक्षा अधिक गुण मिळवलेल्या बंजारा समाजातील 60 विद्यार्थी-विद्यार्थिनींचा प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आले.
कृषिरत्न पुरस्कार- नाविन्यपूर्ण शेती, पाणी व्यवस्थापन, सेंद्रिय शेती व कृषी उत्पादनात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महादेव रोकडे, बसव संगम शेतकरी गट कल्लप्पा भतगुणकी, हत्तरसंग, गुरुपादप्प रोडगे, सोमनाथ हके बोळकवठे, प्रभाकर जाधव, शरद कुंभार, सहायक कृषी अधिकारी या शेतकऱ्यांना "कृषिरत्न पुरस्कार" देऊन सन्मानित करण्यात आले.
कर्मचारी-अधिकाऱ्यांना सेवा गौरव पुरस्कार- अलीकडेच पदोन्नती मिळालेले तसेच सेवानिवृत्त झालेले अधिकारी-कर्मचाऱ्यांचा प्रदीर्घ व निष्ठावान सेवेबद्दल दत्तात्रय जामदार, विठ्ठल, भोसले, अप्पासाहेब कोरे, काशीनाथ राठोड, सुवर्णा कलशेट्टी, रजनी सोनवणे यांचा सेवा गौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.
शिक्षकरत्न सन्मान- शाम जाधव, प्रा. काशिद, हरीश पवार यांना शिक्षक रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आले, तर अजय गवसणे, विश्वलतरती कंपनी चेअरमन श्रीकांत भरले यांना उद्योग रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
समाजरत्न पुरस्कार- जीवनधारा पतसंस्था चेअरमन राजेश चव्हाण तुळजाई अर्थमुवर, वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत डॉ. शरद जाधव कमल हॉस्पिटल, डॉ. संतोष राठोड व डॉ. सुनील वाघमारे- युवराज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांचा समाज रत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ड्रीम फाउंडेशनचे काशिनाथ भतगुणकी यांनी तर आभार स्वाती कलशेट्टी यांनी मानले. 
या कार्यक्रमाला माजी शिक्षणाधिकारी भांजे, उपशहर प्रमुख अंकुश राठोड, माजी नगरसेविका शैलजा राठोड, नेहरू राठोड, उमेश चव्हाण, राहुल राठोड, दीपक पवार, चंदू खडाखडे, संतोष जाधव, विनोद राठोड यांच्यासह समाजातील महिला व पुरुष वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
