या मुलाखतीचे विशेष आकर्षण म्हणजे प्रा. प्रवीण दवणे यांची मुलाखत त्यांचेच चिरंजीव, युवा कवी, लेखक आणि प्राध्यापक आदित्य दवणे घेणार आहेत. दोन पिढ्यांमधील हा साहित्यसंवाद साहित्य, वाचनसंस्कृती, लेखनप्रवास, जीवनमूल्ये आणि नव्या पिढीच्या विचारविश्वावर आधारित असल्याने तो रसिकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
प्रा. प्रवीण दवणे हे मराठी साहित्य विश्वातील लोकप्रिय आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व असून त्यांच्या नावावर 110 हून अधिक पुस्तके आणि 2,000 पेक्षा अधिक मराठी गीते आहेत. 'सावर रे!', 'स्पर्शगंध', 'रंगमेध' यांसारख्या पुस्तकांबरोबरच अनेक गाजलेल्या चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन आणि पटकथा लेखन केलं आहे. प्रभावी वक्ते म्हणूनही त्यांची संपूर्ण महाराष्ट्रात ओळख आहे.
गेल्या दोन वर्षांपासून प्रिसिजन वाचन अभियानाच्या माध्यमातून विविध साहित्यिक, विचारवंत, लेखक आणि मान्यवरांच्या मुलाखती, व्याख्याने व संवाद आयोजित करून सोलापूरमध्ये वाचनसंस्कृतीला चालना देण्याचे कार्य सातत्याने सुरू आहे. "वाचनातून घडते विचारांची पिढी... आणि विचारातून घडतो समृद्ध समाज" हा संदेश घेऊन राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाला साहित्यप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
या विशेष कार्यक्रमाचा लाभ साहित्यप्रेमी, विद्यार्थी, शिक्षक, पालक तसेच प्रेरणादायी विचारांची आवड असलेल्या सर्व नागरिकांनी घ्यावा, असं आवाहन प्रिसिजन फाउंडेशनच्या वतीने करण्यात आलं आहे.
... चौकट
आदित्य दवणे- 'युवा बोध' या लेखमालेद्वारे तरुणांशी संवाद
आदित्य दवणे हे नव्या पिढीतील आश्वासक कवी, लेखक, वक्ते आणि प्राध्यापक आहेत. 'युवा बोध' या लेखमालेद्वारे त्यांनी तरुणांशी संवाद साधला असून 'नातवंडांच्या कविता' आणि 'द पॉइटरी क्लब' यांसारख्या उपक्रमांमुळे त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
