मोका गुन्ह्यातून जामिनावर आलेला आरोपी जेरबंद; 05 गुन्ह्यातील 3, 29, 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त

shivrajya patra

सोलापूर : मनगोळी शिवारातील वस्तीत वयोवृध्द महिलेस जिवे मारण्याची धमकी देऊन तिच्या गळ्यातील व कानातील सोन्याचे दागिने जबरीने चोरल्याच्या गुन्ह्यातील आरोपी सागर उर्फ सागऱ्या सफऱ्या उर्फ सफाल्या शिंदे याच्यासह एका विधीसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेतले. त्यांच्याकडील चौकशीत  05 गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आलंय. सागऱ्या मोका गुन्ह्यातून जामिनावर आलेला आरोपी असून त्याच्याकडून 05 गुन्ह्यातील 3, 29, 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचंही सांगण्यात आलंय.

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ट पोलीस निरीक्षक संजय जगताप यांना सोलापूर ग्रामीण जिल्ह्यामध्ये मालाविषयी गुन्ह्यांचा उकल करण्याकामी व रेकॉर्डवरील पाहिजे फरारी आरोपींचा शोध घेऊन कारवाई करणेबाबत आदेशित केले होते. 

त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ व त्यांचे पथकास मालाविषयी गुन्हयांची उकल व पाहिजे फरारी आरोपी जेरबंद करण्याबाबत सूचना दिल्या होत्या.

त्याप्रमाणे सपोनि ज्ञानदेव वाघ व त्यांचे पथक मालाविषयी गुन्ह्याचा उकल करण्याकामी व फरारी आरोपींचा शोध घेण्याकामी मंद्रुप पोलीस ठाणे हद्दीत पथकातील पोलीस अंमलदार अक्षय डोंगरे यांना गोपनीय माहिती मिळाली. 

सागर सफाल्या शिंदे, त्याचा सावत्र भाऊ आणि त्याचा आणखी एक साथीदार अशा तिघांनी मिळून दक्षिण तालुक्यातील मनगोळी शिवारातील वस्तीत वयोवृध्द महिलेस जिवे मारण्याची धमकी देऊन तिच्या गळ्यातील व कानातील सोन्याचे दागिने जबरीने चोरले असून ते दोघे सध्या अंत्रोळी फाटा येथे चोरीच्या मोटार सायकलसह थांबलेले असल्याचे समजले.  

ही माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांना कळविली असता, त्यांनी सपोनि वाघ यांना कारवाई करण्यासंबंधी आदेश दिले. सपोनि ज्ञानदेव वाघ व त्यांच्या पथकाने अंत्रोळी फाटा येथे मोटार सायकलसह थांबलेले दिसून आलेे. त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडं पथकानं केलेल्या चौकशीत, त्यांची नावे सागर उर्फ सागऱ्या सफऱ्या उर्फ सफाल्या शिंदे (वय- 29 वर्षे), त्याचा सावत्र भाऊ असलेला विधीसंघर्षग्रस्त बालक (दोघे रा. जामगाव, ता. मोहोळ) अशी असल्याचे निष्पन्न झाले. 

उभयतांनी 15 ते 20 दिवसापूर्वी मनगोळी शिवारातील वस्तीवर वयोवृध्द महिलेस जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्या गळ्यातील आणि कानातील सोन्याचे दागिने जबरीने चोरले असल्याचे सांगितले. हा आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याने त्यांचेकडे अधिक तपास करता त्यांनी दामाजी कारखाना रोड मंगळवेढा येथे घरातील महिलेस व मुलास धाक दाखवून लुटल्याचे सांगून कंदलगाव आणि मोहोळ तालुक्यातील हराळवाडी येथे एकाच रात्री 05 घरे फोडल्याचे सांगुन त्यांचे ताब्यात मिळालेली युनिकार्न मोटार सायकल बाळे येथील शिवाजी नगर  येथून चोरल्याचे सांगितले. 

त्यांच्याकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी 16.5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 15 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, एक युनिकॉर्न मोटार सायकल आणि रोख रक्कम असा एकूण 3,29,750  रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. पकडलेला आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्यांचाकडे अधिक तपास चालू असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात आलीय. 

ताब्यात घेतलेला विधीसंघर्षग्रस्त बालक हा एकूण 16 विविध घरफोडीच्या गुन्ह्यात रेकॉर्डवरील पाहिजे असून सागर शिंदे हा कामती, मंद्रुप पोलीस स्टेशनकडील गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी आहे. मोहोळ पोलीस स्टेशनकडील आठ वर्षांपूर्वीच्या भादवि कलम 302 मध्ये नॉन बेलेबल वॉरंट प्रलंबीत आहे. तो सध्या मंगळवेढा तालुक्यातील सोड्डी या गावातील सन 2018 मधील खुनासह दरोड्यातील मोका मधून जामीनावर सुटलेला आरोपी आहे.

ही कामगिरी पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि ज्ञानदेव वाघ, पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर, सफौ/नारायण गोलेकर, धनाजी गाडे, पोहेकॉ/नागेश कोणदे, मोहन मनसावाले, जगदीश राठोड, पोलीस अंमलदार दिनेश पवार, अक्षय डोंगरे, ज्ञानेश्वर पाथरुट, सतिष बुरकुल, महिला पोलीस अंमलदार अश्विनी गोटे, सुनंदा झळके यांच्या पथकानं बजावली.

...... चौकट .....

आरोपीकडून उघडकीस आलेल्या गुन्ह्यांचा तपशिल

पोलीस ठाणे/कलम

- मंद्रुप पोलीस ठाणे 

बीएनएस 309(6), 324(4), 3(5)

- मंगळवेढा पोलीस ठाणे 

बीएनएस 309(4), 3(5)

- मंद्रुप पोलीस ठाणे

बीएनएस 331(4), 305(अ), 3(5)

- कामती पोलीस ठाणे 

बीएनएस 331(4), 305(अ), 3(5)

- फौजदार चावडी पोलीस ठाणे 

बीएनएस 303(2)

---- 000 ----


To Top