'अतुल' निय कामगिरीबद्दल पुरंदरवासीयांकडून कौतुकाचा वर्षाव
पुरंदर : कल्याण-डोंबिवली शहरातील अंमली पदार्थांविरोधातील धडक कारवाईमुळे चर्चेत असलेले पोलीस उपायुक्त अतुल झेंडे आणि त्यांच्या सहकारी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्याची दखल आता थेट कल्याण-डोंबिवली महानगरपालिका महासभेत घेण्यात आली आहे. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महासभेत अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला असून, सर्वपक्षीय नगरसेवकांनी समर्थन देत हा ठराव एकमुखाने मंजूर केला.
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वतीने केलेल्या गौरवाबद्दल पुरंदर वाशियाकडून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत असून सोशल मीडियाच्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या नेतृत्वाखाली कल्याण डोंबिवली पोलीस प्रशासनाने शहरातील अंमली पदार्थांच्या अवैध नेटवर्कविरोधात मागील काही महिन्यांपासून विशेष मोहीम उघडली आहे. या मोहिमेत सहभागी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विविध भागांत धाडसत्र राबवत अनेक आरोपींना मकोका कायद्याअंतर्गत अटक केली असून, कोट्यावधी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे शहरातील व्यसनमुक्ती मोहिमेला बळ मिळाले असून, तरुण पिढीला व्यसनाच्या गर्तेत जाण्यापासून रोखण्यासाठी पोलीस प्रशासन गंभीरपणे काम करत असल्याचे दिसून येत आहे.
शहरातील अनेक भागांत अंमली पदार्थांची विक्री आणि सेवन वाढत असल्याबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात होती. विशेषतः तरुणांमध्ये वाढणारे व्यसन हे पालकांसाठी चिंतेचे कारण बनले होते. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने केवळ कारवाईच नाही, तर माहिती संकलन, गुप्त तपास आणि स्थानिक पातळीवर समन्वय साधत अंमली पदार्थांविरोधात मोठी मोहीम उभारली. 
या मोहिमेत पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्यासह त्यांच्या सहकारी अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत अनेक संशयितांचे जाळे उघडकीस आणले. परिणामी शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तींवरही मोठ्या प्रमाणात आळा बसल्याचे बोलले जात आहे.
महासभेत या विषयावर चर्चा होत असताना अनेक नगरसेवकांनी पोलीस प्रशासनाच्या सामूहिक कामगिरीचे कौतुक केले. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच युवकांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी पोलीस विभाग करत असलेले प्रयत्न अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सदस्यांनी नमूद केले.
अंमली पदार्थांविरोधातील कठोर कारवाईमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, पोलीस प्रशासनाविषयीचा विश्वास अधिक दृढ झाल्याचेही सभागृहात सांगण्यात आले.
पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या नेतृत्वाखाली कल्याण डोंबिवली पोलीस प्रशासनाने विविध गुन्हेगारी कारवायांविरोधात सातत्याने आक्रमक पवित्रा घेतला. अंमली पदार्थांविरोधातील मोहिमेबरोबरच गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाई, संशयितांवर लक्ष आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी घेतलेले निर्णय यामुळे संपूर्ण पोलीस यंत्रणा अधिक सक्रिय झाल्याचे चित्र दिसून येत आहे. या यशामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते स्थानिक पोलीस कर्मचारी आणि तपास पथकातील सहकाऱ्यांचे योगदान महत्त्वपूर्ण मानले जात आहे.
महापालिकेच्या महासभेत मंजूर झालेला अभिनंदनाचा ठराव हा केवळ एका अधिकाऱ्याच्या कार्याचा गौरव नसून, पोलीस उपायुक्त अतुल झेंडे आणि त्यांच्या सहकारी पोलीस अधिकाऱ्यांनी शहराला व्यसनमुक्त व सुरक्षित ठेवण्यासाठी केलेल्या सामूहिक प्रयत्नांची अधिकृत दखल मानली जात आहे.
या निर्णयामुळे संपूर्ण पोलीस दलाचे मनोबल उंचावले असून, भविष्यातही अंमली पदार्थांविरोधातील मोहिम अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नागरिकांकडूनही या कारवाईचे स्वागत होत असून, शहरात अशाच धडक कारवाया यापुढेही सातत्याने सुरू राहाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
***
शब्दभार : खिजर पगडीवाले.
