श्रमिक पत्रकार संघातर्फे शालेय साहित्याचे वाटप
सोलापूर : सोलापूर श्रमिक पत्रकार संघाने केवळ पत्रकारांचे प्रश्न मांडण्यापुरते काम मर्यादित ठेवले नाही. विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, पत्रकारांसाठी मेडिक्लेम योजना आणि विविध सामाजिक उपक्रम राबवून संघटनेने आदर्श निर्माण केला आहे. पत्रकारिता हे आव्हानात्मक क्षेत्र असून, पत्रकारांनी एकत्र येऊन परस्परांना बळ देणे गरजेचे आहे. शालेय साहित्य वाटप हा केवळ उपक्रम नसून पत्रकार कुटुंबांना एकत्र आणणारा आणि संघटनेविषयी आत्मीयता निर्माण करणारा उपक्रम आहे, असे गौरोद्गार आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी काढले.
सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने महापौर विनायक कोंड्याल, डॉ. शैलेशकुमार पाटील फाउंडेशन, शहाजीराजे पवार युवा मंच आणि राजदीप (एचपी) गॅस एजन्सी यांच्या सहकार्याने आयोजित पत्रकारांच्या पाल्यांना शालेय साहित्य वाटप समारंभात आमदार कल्याणशेट्टी बोलत होते.
याप्रसंगी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शहाजी पवार, डॉ. शैलेशकुमार पाटील फाउंडेशनचे व्हाईस प्रेसिडेंट जगदीश पाटील यांच्या हस्ते शालेय साहित्य वाटप करण्यात आले. 
यावेळी विचारमंचावर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष तथा नगरसेवक मनीष केत, दैनिक दिव्य मराठीचे संपादक महेश रामदासी, दैनिक तरुण भारतचे मुख्य संपादक प्रशांत माने, दैनिक तरुण भारत संवादचे निवासी संपादक विजयकुमार देशपांडे, दैनिक जनसत्यचे संपादक सरदार अत्तार, दैनिक सकाळचे वृत्त संपादक वैभव गाढवे, न्यूज प्लस चॅनलचे संचालक तात्यासाहेब पवार , श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, खजिनदार किरण बनसोडे, उपाध्यक्ष आफताब शेख आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
संस्कृतमधील 'समानशीलव्यसनेषु सख्यम्' या उक्तीचा उल्लेख करत आ. कल्याणशेट्टी पुढे म्हणाले की, समान विचार आणि समान ध्येय असलेली माणसे एकत्र आली, तर त्यातून मजबूत संघटना निर्माण होते. अडचणींवर मात करता येते. प्रत्येक क्षेत्रात संघर्ष आहे.
राजकारण असो, पत्रकारिता असो, वैद्यकीय क्षेत्र असो किंवा इतर कोणतेही क्षेत्र असो, प्रत्येकाच्या वाट्याला काही ना काही अडचणी येतात. एकजुटीतून त्या सोडवता येतात. सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करत त्यांनी संघाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 
याप्रसंगी शहाजी पवार म्हणाले, कोणतीही दुर्घटना घडो, भूकंप असो, पूरस्थिती असो, पंढरपूरची वारी असो किंवा सिद्धरामेश्वर यात्रेसारखे धार्मिक सोहळे असोत, लोकप्रतिनिधी पोहोचण्यापूर्वी घटनास्थळी पत्रकार उपस्थित असतात. पत्रकार सुखातही सोबत असतो आणि दुःखातही. समाजातील प्रत्येक घडामोड नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम पत्रकार प्रामाणिकपणे करतात.
समाजातील सर्वसामान्य माणसाला आजही पत्रकारांवर विश्वास आहे. पत्रकारांनी एखादा प्रश्न उचलून धरला, तर न्याय मिळेल, अशी भावना समाजामध्ये आहे. त्यामुळे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची जबाबदारी अधिक महत्त्वाची असून पत्रकार होणे हे पुढारी होण्यापेक्षाही कठीण काम आहे.
प्रास्ताविक श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी केले. सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले तर खजिनदार किरण बनसोडे यांनी आभार मानले. यावेळी वृत्तपत्र, वृत्तवाहिनी यांचे पत्रकार तसेच पाल्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
***
शब्दभार : इमरान सगरी.
