सोलापूर : आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त रविवारी, 21 जून रोजी सोलापूर पोलीस आयुक्तालय यांच्या वतीने कवायत मैदान पोलीस मुख्यालय येथे योगा शिबीराचे आयोजन करण्यात आले होतं. योग प्रशिक्षक योगाचार्य विश्वंभर घोलप आणि बापूराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या योग शिबीरामध्ये सुमारे २०० अधिकारी, अंमलदार व कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला.
या कार्यक्रमास पोलीस आयुक्त एम. राजकुमार, सौ. वृष्टी जैन (पोलीस मुख्यालय), पोलीस उपआयुक्त (गुन्हे/विशा) डॉ. अश्विनी पाटील, प्रितम यावलकर (परिमंडळ) तसेच इतर पोलीस अधिकारी, अंमलदार व कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमामध्ये योग प्रशिक्षक योगाचार्य विश्वंभर घोलप आणि योगाचार्य बापूराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तणाव कमी करण्यासाठी उपयुक्त विविध प्राणायम तसेच शरीर लवचिक व निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक योगासने यांचे प्रात्याक्षिक व प्रशिक्षण देण्यात आले. 
यावेळी मार्गदर्शन करताना, पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे महत्व विशद केले. नियमित योगाभ्यासामुळे शारीरीक व मानसिक आरोग्य उत्तम राहते तसेच तणावमुक्त जीवन जगण्यास मदत होते, असे सांगून सर्वानी आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करण्याचे आवाहन केले
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मानव संसाधन विभागाचे पो.नि. पाटील व इतर पोलीस अंमलदार व राखीव पोलीस निरीक्षक मुख्यालय यांनी विशेष परिश्रम घेतले. हे योग शिबीर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.
