सरपंचाच्या मनमानीविरुध्द शिवसेना गुरुवारी ठोकणार एकरूख ग्रामपंचायतीला टाळे

shivrajya patra

सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील मौजे एकरूख तरटगावच्या सरपंच यांच्या मनमानी गैरकारभार तसेच पदाचा दुरुपयोग प्रकरणी गटविकास अधिकारी यांना 13 जून रोजी निवेदनाद्वारे कारवाई ची मागणी करण्यात आली होती, त्यावर गटविकास अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याच्या ऐवजी केवळ ' कागदी घोडे ' नाचविले. त्याच्या निषेधार्थ गुरूवारी, 03 जुलै रोजी एकरूख ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्याचा इशारा शिवसेनेचे जिल्हा सचिव जावेद पटेल यांनी एका निवेदनाद्वारे दिला.

' गाळयुक्त शिवार, गाळमुक्त धरण ' या शासन योजनेनुसार उत्तर सोलापूर तालुक्यातील विशेषतः एकरूख, तरटगांव येथील शेतकऱ्यांनी आपापल्या शेतात गाळ टाकून घेतला होता. शासनाकडून त्याचं अनुदान आल्यावर एकरूख-तरटगांवचे सरपंच यांनी लाभार्थी शेतकऱ्यांना आलेल्या निधीच्या धनादेशावर स्वाक्षरी करून त्याचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे अपेक्षित होतं, मात्र त्यांनी आर्थिक लालचेपोटी त्या धनादेशावर स्वाक्षरी करण्याऐवजी पैशाची मागणी सुरू केली.

सरपंच पैसे मिळाल्याशिवाय स्वाक्षरी करीत नसल्याची अडेलतट्टूपणाच्या भूमिकेवर कायम असल्याची गंभीर बाब पुढे आल्यावर गटविकास अधिकाऱ्यांना एक निवेदन देण्यात आलं होतं. त्यात सरपंच यांना ' त्या ' धनादेशावर स्वाक्षऱ्या करण्याचे निर्देश देण्याची मागणी करण्यात आली होती, त्यावर गटविकास अधिकाऱ्यांनी सरपंच यांना स्वाक्षरीचे निर्देश देण्याबरोबरच ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार कलम 39 (1)प्रमाणे कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला होता, हा केवळ ' कागदोपत्री घोडे ' नाचविण्याचा प्रकार असून कठोर कारवाई होणे अपेक्षित होते, अशी निवेदनकर्त्यांची आग्रही मागणी होती.

गटविकास अधिकाऱ्यांनी सरपंच यांना धनादेशावर स्वाक्षरी करुन शेतकऱ्यांची अडवणूक टाळावी, अशी सूचना दिल्यानंतरही सरपंच यांच्या भूमिका वा वर्तनात अपेक्षित बदल झाला नाही, त्यांनी आपला पदाचा दुरुपयोग करण्याचा उद्योग चालूच ठेवले असून हा मनमानी कारभार थांबावा व तात्काळ कठोर शासन व्हावे, त्याशिवाय ग्रामपंचायत स्तरावरून विकास कामे व्हावे, झालेली विकास कामे गुणवत्ता पूर्ण व्हावीत, मागील 2 वर्षात निकृष्ट दर्जाची कामे झाल्याने शासनाचा निधी पाण्यात गेला आहे. त्याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्या सर्व कामांचं गुणवत्ता परीक्षण होऊन दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी त्या निवेदनात करण्यात आली आहे.

अशा संकट समयी गटविकास अधिकारी केवळ कागदी घोडे नाचविण्यात दंग असल्याने मनमानी सरपंच व बिनकामी ग्रामपंचायत यांच्यावर कायदेशीर कारवाई होत नाही, तोपर्यंत ग्रामपंचायत कार्यालयास गुरुवारी, 03 जुलै रोजी टाळे ठोकण्याचा इशारा शिवसेनेचे जिल्हा सचिव जावेद पटेल यांनी गटविकास अधिकारी उत्तर सोलापूर यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

त्यावेळी कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी गटविकास अधिकारी यांची असणार आहे, अशा आशयाचे पत्र देण्यात आले आहे.  या निवेदनाची प्रत सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचंही सांगण्यात आलंय.

To Top