सोलापूर : भविष्य निर्वाह निधी मधून 5 लाख रुपये काढण्यासाठी मंजुरी देण्याकरिता सहशिक्षकाला 06 हजार रूपयांची लाच मागून करून ती रक्कम ग्रंथपालाकरवी स्विकारल्याच्या प्रकरणात तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना गुरुवारी माध्यमिक शिक्षण विभाग कार्यालयात घडली. एसीबीच्या या कारवाईमुळं शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडालीय.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, भविष्य निर्वाह निधी मधून 5 लाख रुपये रक्कम काढण्याकरीता एका सहशिक्षकाने अधीक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी माध्यमिक शिक्षण विभाग, सोलापूर यांच्याकडे अर्ज सादर केला होता.
तक्रारदार शिक्षकाला भविष्य निर्वाह निधी मधील 5 लाख रुपये रक्कम मंजूर करण्यासाठी 15 जून रोजी कार्यालय अधीक्षक बालवाड यांनी 01 हजार रुपये, वरिष्ठ लिपीक मेटकरी यांनी 04 हजार रुपये आणि ग्रंथपाल बारबोले यांनी 01 हजार रुपये अशी एकूण 06 हजार रुपये लाचेची रक्कम पडताळणी दरम्यान पंचासमक्ष केली होती. गुरुवारी, 18 जून रोजी 06 हजार रुपये लाचेची रक्कम ही सापळा कारवाई दरम्यान लोकसेवक ग्रंथपाल बारबोले यांनी स्वतः स्विकारल्याने रंगेहाथ पकडण्यात आले.
एसीबीची पडताळणी व सापळा कारवाईवरून लोकसेवक लक्ष्मण दत्तात्रय बालवाड (वय-55 वर्षे, व्यवसाय नोकरी, पद अधीक्षक वर्ग-2 वेतन पथक व भविष्य निर्वाह निधी कार्यालय, सोलापूर), अण्णासाहेब दगडू मेटकरी (वय- अंदाजे 48 वर्षे, व्यवसाय नोकरी, पद वरिष्ठ लिपीक वर्ग-3, वेतन पथक व भविष्य निर्वाह निधी कार्यालय, सोलापूर) आणि विक्रम हरिश्चंद्र बारबोले (वय-55 वर्षे, व्यवसाय नोकरी, पद ग्रंथपाल वर्ग-3. नेमणूक - श्रीमती रामबाई बाबूलाल सुराणा विद्यालय चिकलठाण ता. करमाळा.) या आरोपितांविरुध्द जेल रोड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा कलम 7, 12 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सोलापूर एसीबी युनिटकडील पोलीस निरीक्षक शैलेश पवार यांनी पडताळणी अधिकारी म्हणून काम पाहिले. पोलीस निरीक्षक रविंद्र लांभाते यांच्याकडं या गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.
ही कारवाई पोलीस उपायुक्त/पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे (एसीबी पुणे, मो.क्र 9823167154), अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील (एसीबी पुणे. मो.क्र 9029030530) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले (एसीबी सोलापूर. मो.क्र. 9823225465) पोलीस निरीक्षक शैलेश पवार, पोलीस निरिक्षक रवींद्र लांभाते, सपोफौ सायबन्ना कोळी, पोलीस हवालदार स्वामीराव जाधव, पोलीस हवालदार सलीम मुल्ला, पोलीस हवालदार शिरिषकुमार सोनावणे, पोलीस हवालदार श्रीराम घुगे, पोलीस हवालदार संतोष नरोटे, पोकॉ गजानन किणगी, पोकॉ राजू पवार, पोकॉ रवी हातकीळे, पोकॉ सचिन राठोड, चापोकॉ अक्षय श्रीराम (सर्व नेमणूक-एसीबी सोलापूर) यांनी केली.
.......नागरिकांना आवाहन
लोकसेवक शासकीय अधिकारी/कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजंट) हे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करित असल्यास त्याबाबत तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर कार्यालयास संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले यांनी केले आहे.
