आषाढी यात्रा कालावधीत ड्रोन प्रतिबंधित क्षेत्र घोषीत

shivrajya patra

सोलापूर : पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी (सोलापूर ग्रामीण) यांच्याकडील पत्राअन्वये श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आषाढीवारी यात्रा,19 ते 29 जुलै या कालावधीत पार पडणार आहे. आषाढीवारी यात्रेचा मुख्य दिवस, 24 जुलै 2026 दशमी, 25 जुलै  देवशयनी आषाढी एकादशी आणि 29 जुलै रोजी पौर्णिमा आहे. 

आषाढी वारी यात्रा कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक लोक श्रीक्षेत्र पंढरपूर येथे येत असतात. तसेच आगामी आषाढीवारी यात्रा कालावधीमध्ये दहशतवादी संघटना जसे की, जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा, हिजबुल मुजाहीद्दीन वा अन्य संघटनाकडून त्यांचे स्लीपर सेल सक्रीय केले जाण्याची शक्यता आहे. 

भारत-पाकिस्तान या देशांतील तणावाचे दरम्यान ड्रोनचा मोठ्या प्रमाणात वापर केल्याचे दिसून आले आहे. दहशतवादी कारवाया करणारे दहशतवादी हे स्थानिक लोकात मिसळून तात्पुरत्या स्वरुपात वास्तव्य करुन आगामी उत्सव कालावधीमध्ये ड्रोनद्वारे घातपाती कृत्य करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मानवी जिवीताचे आणि मालमत्तेचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर अशा घटनांमुळे जनमाणसामध्ये घबराटीबरोबरच असुरक्षिततेचे वातावरण निर्माण होऊन कायदा तसेच सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. दहशतवादी कारवायामध्ये दहशतवादी हे आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे ड्रोनचा वापर करीत आहेत.

ज्याअर्थी, सोलापूर जिल्ह्यातील आपल्या स्थळसिमा हद्दीतील सर्व मर्मस्थळे व महत्वाचे धार्मिक स्थळे श्री. विठ्ठल रूक्मीणी मंदिर, पंढरपूर, श्री. स्वामी समर्थ मंदिर, अक्कलकोट तसेच पालखी मार्ग यांचे सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी ड्रोन उडविण्यास परवानगी देण्यात येऊ नये. जेणेकरून भविष्यात होणाऱ्या एखाद्या दहशतवादी कारवाईस, गुन्ह्यास प्रतिबंध होऊ शकतो आणि सार्वजनिक कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न अबाधित राहण्यास मदत होईल. तसेच लोकामध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण होऊन सार्वजनिक शांतता वाढीस लागण्यास बळ मिळेल.

वर नमूद सर्व परिस्थितीचा विचार करून भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 नुसार घोषणापत्र काढून संबंधित पोलीस ठाणे हद्दीतील सर्व मर्मस्थळे, महत्वाचे धार्मिक स्थळे, पालखी मार्ग यांचे सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी ड्रोन प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषणापत्र जाहिर करण्यात यावे. तसेच जिल्ह्यातील ड्रोन परवाना धारक व चालक यांनी त्यांच्याकडील ड्रोनची माहिती संबंधित पोलीस ठाण्याला देणे बंधनकारक करणेसंबंधी आपल्या कार्यालयाकडून सोलापूर जिल्ह्याचे ग्रामीण हद्दीत व सर्व नगरपालिका हद्दीत लागू करण्यात यावे. 

हे घोषणापत्र, 08 जून रोजी पासून पुढे 60 दिवस लागू करण्याबाबतचे आदेश काढणे आणि या धार्मिक स्थळी येणाऱ्या सर्व पालखी मार्गावर टि.व्हि. चॅनल्स, खाजगी व्यक्ती, संस्था तसेच पालखी सोहळ्याचे छायाचित्रण करणारे यांना नोटीस देऊन त्यांची बाजू ऐकणे शक्य नसल्याने एकतर्फी आदेश काढण्यात येत आहेत.

सोलापूर ग्रामीण हद्दीत (पोलीस आयुक्तालय हद वगळून) व सर्व नगरपालिका हद्दीत दि. 08 जून रोजीपासून पुढे 60 दिवस या कालावधीत सोलापूर जिल्ह्यात सर्व मर्मस्थळे, महत्वाचे धार्मिक स्थळे श्री. विठ्ठल-रुक्मीणी मंदिर, पंढरपूर, श्री. स्वामी समर्थ मंदिर, अक्कलकोट येथे ड्रोन उडविण्यास बंदी चे आदेश अपर जिल्हा दंडाधिकारी अभिजीत पाटील यांनी दिले आहेत.

To Top