राज्यभरातील महिला कर्मचाऱ्यांचा सहभाग; सोमवारपासून तीन दिवस क्रीडा, कला आणि संस्कृतीचा अनोखा संगम
सोलापूर/12 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्यावतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त 15 ते 17 जून या कालावधीत आंतरविद्यापीठ महिला कर्मचारी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा (महिला महोत्सव-2026) आयोजित करण्यात आली आहे. राज्यातील विविध 05 विद्यापीठांमधील महिला कर्मचाऱ्यांना एकत्र आणत त्यांच्यातील क्रीडा, सांस्कृतिक व कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रभारी कुलसचिव तथा क्रीडा संचालक डॉ. अतुल लकडे यांनी दिली.
महिला कर्मचाऱ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देण्याबरोबरच परस्पर संवाद, मैत्री आणि संघभावना वृद्धिंगत करण्यासाठी हा महोत्सव महत्त्वपूर्ण ठरणार आहे. 
तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात विविध सांस्कृतिक स्पर्धांसह क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून राज्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील महिला कर्मचारी यामध्ये सहभागी होणार आहेत.
महिला महोत्सवाचे उद्घाटन 15 जून रोजी सकाळी 11 वाजता विद्यापीठाच्या नवीन मुख्य प्रशासकीय इमारतीतील अहिल्या भवन येथे होणार आहे. उद्घाटक म्हणून उद्योगवर्धिनी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा व ज्येष्ठ समाजसेविका चंद्रिका चौहान या उपस्थित राहणार आहेत. प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा हे यावेळी उपस्थित राहणार आहेत. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. 
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी उद्घाटनानंतर वैयक्तिक गायन, समूह गायन, वैयक्तिक नृत्य, समूह नृत्य आणि रांगोळी अशा विविध सांस्कृतिक स्पर्धा पार पडणार आहेत.
दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 जून रोजी रोड रेस, बॅडमिंटन, खो-खो आणि टग ऑफ वॉर (रस्सीखेच) अशा क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. महिला कर्मचाऱ्यांमधील क्रीडागुण, शारीरिक क्षमता आणि संघभावना यांचे दर्शन या स्पर्धांमधून घडणार आहे. 
महोत्सवाचा समारोप व पारितोषिक वितरण सोहळा 17 जून रोजी सकाळी 11 वाजता विद्यापीठ सभागृहात होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर राहणार असून उद्घाटक म्हणून महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी (भा.प्र.से.) उपस्थित राहणार आहेत. विशेष उपस्थिती म्हणून सुप्रसिद्ध कवयित्री व व्याख्यात्या डॉ. स्वाती शिंदे-पवार सहभागी होणार आहेत.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यातून प्रेरणा घेत महिला सक्षमीकरण, नेतृत्व विकास, क्रीडा संस्कृती आणि सांस्कृतिक जतन या मूल्यांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला हा महिला महोत्सव राज्यातील विद्यापीठ क्षेत्रासाठी एक प्रेरणादायी उपक्रम ठरणार असल्याचा विश्वास विद्यापीठ प्रशासनाने व्यक्त केला आहे.
याबरोबरच महिला कर्मचाऱ्यांना एकमेकांच्या विद्यापीठातील कामाची कार्यपद्धती जाणून घेता येणार आहे. महिला कर्मचाऱ्यांच्या सहभागामुळे विद्यापीठ परिसरात उत्साहाचे आणि सांस्कृतिक चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
