सोलापूर : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वाईल्डलाईफ काँझर्वेशन असोसिएशन, सोलापूर यांच्या वतीने बाळे येथील एन. के. किड्स स्कूलमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विद्यार्थ्यांमध्ये वृक्षप्रेम आणि निसर्ग जतनाची भावना रुजविण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी वाईल्डलाईफ काँझर्वेशन असोसिएशनचे कार्यकर्ते अजित चौव्हाण, सुरेश क्षीरसागर, संतोष धाकपाडे, संस्थेचे संचालक विकास कस्तुरे, मुख्याध्यापिका श्वेता कस्तुरे, शिक्षिका रोहिणी आदलिंगे, पुनम कळसाईत, सुवर्णा गावडे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व समजावून सांगत प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन केले. 
वाढतं प्रदूषण, जंगलतोड, हवामानातील बदल आणि जागतिक तापमानवाढ यांसारख्या गंभीर समस्यांवर मात करण्यासाठी वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन ही काळाची गरज असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
मानवी जीवनासाठी शुद्ध हवा, पाणी आणि संतुलित पर्यावरण आवश्यक असून झाडे ही पृथ्वीची फुफ्फुसे आहेत. झाडांमुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण कमी होऊन ऑक्सिजनचे प्रमाण वाढते. तसेच मृदसंवर्धन, पावसाचे संतुलन आणि जैवविविधतेचे संरक्षण यामध्ये वृक्षांचे महत्त्वपूर्ण योगदान असते. त्यामुळे पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग घेणे आवश्यक असल्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
कार्यक्रमाच्या अखेरीस उपस्थितांनी पर्यावरण संवर्धनाची शपथ घेतली आणि लावलेल्या वृक्षांचे नियमित संगोपन करण्याचा निर्धार व्यक्त केला. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित हा उपक्रम विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसाठी प्रेरणादायी ठरला.
