सोलापूर : साखर कारखानदारीत वेगवेगळ्या पातळीवर होत असलेली फसवणूक रोखण्यासंबंधी गॅंगमेन ही कंपनी गतवर्षी स्थापन केली असून, यामध्ये आम्ही ऊस तोडणी कामगार, गट प्रमुख, मुकादम, वाहतूकदार, शेतकरी तसेच कारखाना प्रशासनासोबत चर्चा करून त्यांच्या समस्या दूर करण्यासाठी गॅंगमेन (Gangmen) स्मार्ट डिजिटल सोल्यूशन विकसित करण्यात आलं आहे. यामुळे मुकादम, वाहतूकदार यांच्याकडून होणारी कोणतीही फसवणूक टाळता येणे शक्य होणार असल्याचे गॅंगमेन (Gangmen Technologies Pvt. Ltd) टेक्नॉलाजीचे सीईओ महादेव मुरकुटे यांनी शुक्रवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत सांगितले.
आपल्या राज्यात जवळपास 216 साखर कारखाने असून शेजारच्या कर्नाटक राज्यात 100 साखर कारखाने आहेत. या साखर कारखान्यात ऊस वाहतूकदार, मुकादम आणि तोडणी कामगार यांच्याकडून कोट्यावधी रूपयांच्या फसवणुकीचे किस्से नेहमी चर्चेत असतात. गोड साखरेच्या कडवट कहाण्यात पदोपदी साखर कारखान्यांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक होत आली आहे. 
या साखळीत अनेकांचे प्रपंच उद्ध्वस्त झाल्याच्या घटना घडल्या आहेत, तर काहींना आत्महत्या कराव्या लागल्या आहेत, हे मी स्वतः पाहिलं अन् अनुभवल्याचे गॅंगमेन (Gangmen Technologies Pvt. Ltd) टेक्नॉलाजीचे सीईओ महादेव मुरकुटे यांनी प्रारंभी सांगितलं.
प्रतिवर्षी वाहतूकदार, मुकादम व तोडणी कामगारांमुळे 03 ते 05 कोटी रुपयांपर्यंत कारखान्याची फसवणूक होते. लेबर चेकिंगसाठी जाणाऱ्या टीमचा अंदाजे 25 लाख रुपये खर्च होतो. शेतकरी, वाहतूकदार, लेबर सर्वांना देण्यात येणाऱ्या स्लिप प्रिंटिंग चा खर्च अंदाजे 10 लाख रुपयांपर्यंत होतो. त्यास टेक्नोलॉजीचा वापर नसल्यामुळे फसवणुकीचे प्रमाण अधिक आहे. हा सर्व खर्च असूनही 30 टक्क्यांपर्यंत लेबर यंत्रणा अपुरी पडते.
साखर कारखान्यांकडून लेबर चा अॅडव्हॉन्स अधिक असल्यामुळे फसवणूक होण्याची शक्यताही जास्त असते. त्यातच फसवणुकीची शक्यता लक्षात घेता कारखानदारांना 30 ते 40 टक्के जास्तीची कामगार (लेबर सिस्टीम) बुक करावी लागते.
साखर कारखानदारीत ऊसतोडणी कामगार मुकादमांना फसवतात. मुकादम वाहतूकदारांना फसवतात. वाहतूकदार गट प्रमुख आणि कारखानदारांना फसवतात. अशा फसवणुकीचे प्रकार गॅंगमेन (Gangmen) स्मार्ट डिजिटल सोल्यूशन या सॉफ्टवेयरमुळे पूर्णतः बंद होतील, पर्यायाने कारखान्याच्या खर्चात लक्षणीय बचत होऊन कारखान्याच्या नफ्यात वाढ होणे शक्य आहे, असेही सीईओ मुरकुटे यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले.
गॅंगमेन (Gangmen) स्मार्ट डिजिटल सोल्यूशन या सॉफ्टवेयरमुळे प्रत्येक ऊसतोडणी मजुराचे, मुकादम, वाहतूकदार यांचे आधार पडताळणी केल्यामुळे फसवणुकीचे प्रमाण कमी होईल. राज्यात साखर उद्योगामध्ये होणाऱ्या हजारो गुन्हे कमी होतील. या सॉफ्टवेयरचे सादरीकरणासाठी तसेच, चालू वर्षातील वाहतूकदार व मुकादम आणि कामगार यांची नोंद Gangmen App मध्ये करण्यासाठी मदत कारखानदार, वाहतुकदार आणि मुकादम यांनी पुढं येणं गरजेचे आहे. 
Google Play Store मध्ये जाऊन गँगमेन अॅप DownLoad करणे आवश्यक आहे. ही सेवा मिळवण्यासाठी अत्यल्प शुल्क आकारले जाणार असलं तरी साखर साखळीत होणारी मोठ्या प्रमाणात होणारी संभाव्य फसवणूक टाळता येणे शक्य होणार असल्याचेही मुरकुटे यांनी शेवटी सांगितले.
या पत्रकार परिषदेस Investor & Strategic Mentor वनिता खेडगी(दोडमनी) याही उपस्थित होत्या.
