कुमठे प्रशालेसह विविध शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा

shivrajya patra

सोलापूर : कुमठे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय कुमठे येथे सोमवारी, 15 जून रोजी शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. प्रथमतः शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. ब्रह्मदेव दादा माने यांच्या प्रतिमेचे पूजन प्राध्यापक संजय जाधव यांच्या हस्ते  करून सर्व विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. 

विद्यार्थ्यांच्या स्वागतानंतर त्यांना पुस्तक वाटप करण्यात आले. तसेच नूतन पर्यवेक्षक विजयसिंह क्षीरसागर  यांनी आपल्या पदाचा कार्यभार आज स्वीकारला. या कार्यक्रमास प्रशालेचे मुख्याध्यापक जयसिंग गायकवाड, माजी पर्यवेक्षक वसंत गुंगे, राष्ट्र विकास प्राथमिक विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका मंजुश्री जमखंडीकर, प्रशालेतील सर्व शिक्षक- शिक्षकेतर सहकारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

*****

दि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीज हायस्कूलमध्ये प्रवेशोत्सव साजरा

सोलापूर : येथील दि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीज हायस्कूलमध्ये सोमवारी, 15 जून रोजी शाळेत प्रवेशोत्सव कार्यक्रम अतिशय आनंदाने साजरा करण्यात आला. शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक अब्दुल गफूर सगरी यांच्या शुभहस्ते पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. 

तसेच प्रवेशोत्सववेळी गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव करीत विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आले. त्याचवेळी नवीन प्रवेश घेणाऱ्या इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देण्यात आले. मुख्याध्यापक अ. अब्दुल गफुर सगरी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.  

दरम्यान मुख्याध्यापक अ. अब्दुल सगरी यांनी पुस्तकाविषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास शाळेतील पर्यवेक्षिका सौ. सादेका बारागजी, शिक्षक जुल्फिकार नदाफ, फारूक बिद्री, परविन मुजावर, सरदार नदाफ, एजाज शेख, निकहत शेख, मेहरून सय्यद, महेर शेख, हिना कौसर चितापुरे, शाळेतील ग्रंथपाल जाफर बांगी यांच्यासह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

ग्रंथपाल जाफर बांगी यांनी सूत्रसंचालन केले तर  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

*****

एन. के. किड्स स्कूलचा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

बाळे (प्रतिनिधी) : येथील राजेश्वरी नगरातील एन के किड्स स्कूलमध्ये शैक्षणिक वर्ष 2026-27 चा प्रवेशोत्सव आणि शाळेचा पहिला दिवस अतिशय उत्साहपूर्ण व आनंददायी वातावरणात साजरा करण्यात आला. चिमुकल्यांच्या निरागस हास्याने आणि पालकांच्या उत्साहाने संपूर्ण शाळा परिसर भारावून गेला होता.

कार्यक्रमाची सुरुवात देवी सरस्वतीच्या पूजनाने करण्यात आली. मुख्याध्यापिका श्वेता कस्तुरे, शिक्षिका पुनम कळसाई, रोहिणी आदलिंगे व प्राजक्ता भस्मे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.

शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांना फुले, फुगे आणि चॉकलेट देत जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी शाळेचा परिसर रंगीबेरंगी फुगे, आकर्षक कार्टून पात्रे आणि विविध चित्रांनी सजविण्यात आला होता. त्यामुळे शाळेत प्रथमच येणाऱ्या चिमुकल्यांना आनंददायी आणि खेळकर वातावरणाचा अनुभव मिळाला.

शाळेच्या पहिल्या दिवशी काही चिमुकले आई-वडिलांपासून दूर होताना रडत होते, तर काही नवीन मित्र-मैत्रिणींसोबत हसत-खेळत शाळेच्या वातावरणात रमून गेले होते. त्यांच्या निरागस भावभावनांनी उपस्थित पालकांचेही मन हेलावून गेले. चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि कुतूहल पाहून प्रवेशोत्सवाचे खरे सार्थक झाल्याची भावना व्यक्त होत होती.

हा प्रवेशोत्सव यशस्वी करण्यासाठी सेविका संगीता हेडगडकर, सुनिता शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले. शाळेच्या सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला.

नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात आनंद, उत्साह आणि सकारात्मक वातावरणात झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबाबतची आवड निर्माण होण्यास निश्चितच मदत होणार असल्याचा विश्वास पालकांनी व्यक्त केला.

To Top