सोलापूर : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त जनसेवा संघटनेच्या वतीने जनसेवा संघटनेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथील कार्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे सामाजिक न्याय, समता आणि लोककल्याणकारी विचारांचे महान पुरस्कर्ते होते. त्यांनी आपल्या संस्थानात शिक्षणाचा प्रसार, मागास व वंचित घटकांना संधी, सामाजिक भेदभाव निर्मूलन, महिला शिक्षणाला प्रोत्साहन आणि समाजातील दुर्बल घटकांच्या उत्थानासाठी ऐतिहासिक कार्य केले.
त्यांनी सन 1902 मध्ये मागास घटकांसाठी आरक्षणाची व्यवस्था लागू करून सामाजिक न्यायाचा नवा आदर्श निर्माण केला. शाहू महाराजांनी आपल्या राज्यकारभारातून सर्वसामान्य जनता केंद्रस्थानी ठेवली.
शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे, हा विचार त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिला. सामाजिक समता, बंधुता आणि मानवतेचा संदेश देत त्यांनी जातीभेदाच्या भिंती दूर करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांचे कार्य आजही समाजाला प्रेरणा देणारे असून त्यांच्या विचारांमधून सामाजिक बांधिलकी, सेवाभाव आणि सर्व घटकांना सोबत घेऊन पुढे जाण्याची ऊर्जा मिळते. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांपासून प्रेरणा घेत समाजात समता, एकोपा आणि सेवाभाव वाढविण्यासाठी जनसेवा संघटना सातत्याने कार्यरत आहे.
जनसेवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष व मार्गदर्शक डॉ. धवलसिंह प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेच्या माध्यमातून समाजहिताचे विविध उपक्रम, जनजागृती आणि लोककल्याणाची कामे सातत्याने राबविण्यात येत आहेत. यावेळी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समता, न्याय आणि सेवाभावाच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प करण्यात आला.
यावेळी जनसेवा संघटनेचे शिरीष जगदाळे, ज्योतिबा गुंड, दिलीप भोसले, शेखर भोसले, श्रेयश माने, सतीश वावरे, प्रशांत देशमुख, अजय सोमदळे, दिलीप निंबाळकर, अजित पाटील, सचिन थोरात, सचिन मस्के, नाना कामाने यांच्यासह पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
