भारतीय समाजव्यवस्थेत सामाजिक न्याय, समता आणि शिक्षण यांचा पाया मजबूत करणारे अनेक महान समाजसुधारक झालेत. त्यात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांनी आपल्या राज्यकारभारातून बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले. शाहू महाराजांचे विचार केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित नसून आजच्या आधुनिक युगातही आणि पुढील काळातही ते तितकेच प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरणार आहेत.
शाहू महाराजांनी शिक्षणाला समाज आणि देश घडविणारे सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन मानले. त्यांनी शेतकरी-कष्टकरी, महिला आणि मागासवर्गीयांसाठी शिक्षणाची दारे खुली केली.
आजच्या काळातही शिक्षण हे सामाजिक आणि आर्थिक प्रगतीचे प्रमुख साधन आहे. आधुनिक AI-डिजिटल युगात शिक्षणाच्या संधी वाढल्या, असल्या तरी समाजातील वंचित घटकांपर्यंत दर्जेदार शिक्षण पोहोचविण्याचे आव्हान अजूनही आहे.
अशा परिस्थितीत शाहू महाराजांची सर्वसमावेशक शिक्षणाची संकल्पना अधिक महत्त्वाची ठरते, परंतु शासनाचे सर्व शैक्षणिक धोरण पाहता शाहू महाराजांच्या शैक्षणिक भूमिकेविरोधी आहे आणि हे सर्व शाहू महाराजांचा जयजयकार करत सुरु आहे. त्यामुळे जनता जेव्हापर्यंत शैक्षणिक लढा उभारत नाही, तेव्हापर्यंत शैक्षणिक शोषण थांबणार नाही.
सामाजिक समता हा शाहू महाराजांच्या विचारांचा केंद्रबिंदू होता. जातिभेद, अस्पृश्यता आणि सामाजिक विषमता दूर करण्यासाठी त्यांनी ठोस पावले उचलली. आजही समाजात विविध स्वरूपातील भेदभाव दिसून येतो.
त्यामुळे संविधानाने दिलेल्या समानतेच्या मूल्यांची अंमलबजावणी करताना आणि ती रुजविण्यासाठी शाहू महाराजांचे विचार प्रेरणादायी ठरतात. सामाजिक ऐक्य बंधुभाव आणि प्रेम निर्माण करण्यासाठी त्यांचे कार्य आजच्या पिढीसमोर आदर्श आहे.
शाहू महाराजांनी कुणबी-मराठा, ओबीसी आणि अस्पृश्यांना नोकरी आणि शिक्षणात आरक्षण (26 जून, 1902) देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. फक्त निर्णयच घेतला नाही तर त्याची कडक अंमलबजावणी केली.
हा निर्णय सामाजिक समता आणि न्यायाच्या दिशेने टाकलेले क्रांतिकारी पाऊल होते. आज आरक्षणाबाबत अनेक चर्चा होत असल्या तरी सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागे राहिलेल्या घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्याची आवश्यकता शाहू महाराजांच्या विचारांतून स्पष्ट होते.
महिला सक्षमीकरणासाठीही शाहू महाराजांनी विशेष प्रयत्न केले. महिलांचे शिक्षण, पुनर्विवाह आणि त्यांचे सामाजिक अधिकार यांना त्यांनी पाठिंबा दिला. आधुनिक काळात महिलांनी अनेक क्षेत्रांत यश संपादन केले असले तरी लिंगभेद, अत्याचार आणि असमानता यांसारख्या समस्या अद्याप अस्तित्वात आहेत. त्यामुळे स्त्री-पुरुष समानतेचा शाहू महाराजांचा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे.
छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात केलेले कायदे म्हणजे स्त्रियांच्या सामाजिक स्वातंत्र्याच्या संरक्षणाचे कायदे होत. 100 वर्षांपूर्वी शाहू महाराज स्त्रियांच्या उद्धाराचा विचार करूनच थांबले नाही, तर कायदे करून ते अंमलात आणले होते.
आम्ही निवडून दिलेले सरकार सुद्धा स्त्रियांच्या संरक्षणाबाबतीत जेवढं दक्ष दिसत नाही, तेवढे दक्ष शाहू महाराज होते. म्हणून आजही शाहू महाराजांच्या विचार आणि कार्याची उपयुक्तता आहे.
शेतकरी आणि कष्टकरी वर्गाच्या कल्याणासाठी शाहू महाराजांनी अनेक योजना राबवल्या. आजच्या आर्थिक स्पर्धेच्या युगात शेतकरी आणि कामगारांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहण्याची गरज आहे. लोककल्याणकारी राज्यव्यवस्थेची त्यांची संकल्पना आजच्या शासन व्यवस्थेलाही दिशा देणारी आहे.
बहुजन समाजाच्या दृष्टीने शाहू महाराजांचे सर्वात मोठे योगदान म्हणजे स्वाभिमान, आत्मविश्वास आणि अधिकारांची जाणीव निर्माण करणे. त्यांनी समाजातील वंचित घटकांना केवळ मदत केली नाही, तर त्यांना नेतृत्व करण्याची संधी दिली.
आधुनिक काळातील सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय सक्षमीकरणासाठी हा विचार अत्यंत आवश्यक आहे. भारतातील सध्याच्या गढूळ राजकारणाला स्वच्छ करण्यासाठी तर अत्यंत आवश्यक आहे.
भारतीय संविधानाने मूल्यांवर आधारित लोकशाही राष्ट्र घडविण्याची संकल्पना मांडलेली आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्याय ही मूल्ये संविधानाने दिलेली आहे. शाहू महाराजांच्या कार्यात आणि विचारांत ही मूल्य स्पष्टपणे दिसून येतात.
त्यामुळे आधुनिक भारत घडविताना आणि बहुजन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करताना शाहू महाराजांचे विचार मार्गदर्शक दीपस्तंभ ठरतात. गरज आहे आजच्या सत्ताधाऱ्यांनी प्रामाणिकपणे संविधानिक मूल्यानुसार राज्यकारभार करण्याची... ! वर्तमानातील पिढीला राजर्षी शाहू महाराजांचे जीवन आणि कार्य हे सामाजिक परिवर्तनाचे उत्तम उदाहरण आहे.
शिक्षण, सामाजिक न्याय, आरक्षण, महिला सक्षमीकरण आणि शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी त्यांनी दिलेला विचार आजच्या काळात अधिकच उपयुक्त ठरतो. त्यांच्या विचारांचा स्वीकार करून समताधिष्ठित, न्यायपूर्ण आणि प्रगत समाज निर्माण करू शकलो तर महाराजांना खरे अभिवादन ठरेल.
@अनिल भुसारी, तुमसर, जिल्हा - भंडारा.
8999843978
