सोलापूर : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, कृषि क्रांतीचे जनक तथा राज्यात सलग अकरा वर्षे मुख्यमंत्री म्हणून कार्य केलेले स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर शहर व जिल्ह्यातील बंजारा समाजातील गुणवंत विद्यार्थी, प्रगतशील शेतकरी तसेच सेवानिवृत्त व पदोन्नतीप्राप्त अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार सोहळा बुधवारी, 01 जुलै रोजी विजापूर रोडवरील इचगिरी मठाजवळील द्वारकाधीश मंदिर हॉल इथं सायंकाळी 04 वाजता आयोजित करण्यात आला आहे.
माजी सहाय्यक आयुक्त तथा विशेष कार्यकारी अधिकारी प्रकाश राठोड यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, "आयुष्य घडविताना" या करिअर मार्गदर्शन उपक्रमांतर्गत बंजारा समाजातील गुणवत्ता, कर्तृत्व आणि सेवाभावाचा गौरव करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या गौरव सोहळ्यात शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील दहावी व बारावी परीक्षेत 70 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवलेल्या बंजारा समाजातील विद्यार्थी-विद्यार्थिनींचा प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देऊन समाजातील भावी अधिकारी, उद्योजक, संशोधक आणि समाजसेवक घडविण्याचा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
तसेच नाविन्यपूर्ण शेती, पाणी व्यवस्थापन, सेंद्रिय शेती आणि कृषी उत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या बंजारा समाजातील शेतकऱ्यांना "कृषिरत्न पुरस्कार" प्रदान करण्यात येणार आहे. स्व. वसंतराव नाईक यांच्या कृषीविषयक विचारांचा वारसा जपणाऱ्या शेतकऱ्यांचा या पुरस्काराद्वारे गौरव केला जाणार आहे.
याबरोबरच अलीकडे पदोन्नती मिळालेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसह सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही त्यांच्या प्रदीर्घ, निष्ठावान आणि उल्लेखनीय सेवेसाठी "सेवा गौरव पुरस्कार" देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
दहावी व बारावी परीक्षेत 70 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवलेल्या पात्र विद्यार्थ्यांनी मार्कशीटची छायाप्रत सादर करून 28 जूनपर्यंत नाव नोंदणी करावी. सत्कारासाठी विद्यार्थ्यांनी पालकांसह वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
नावनोंदणीसाठी अंकुश राठोड (मो. 8308087727) तसेच आकाश चव्हाण (मो. 9764178058) यांच्याशी संपर्क साधावा. समाजातील जास्तीत जास्त गुणवंत विद्यार्थी, कर्तृत्ववान शेतकरी तसेच सेवाभावी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असंआवाहन आयोजकांनी केलं आहे.
