सोलापूर : उच्च न्यायालयाचे बेकायदेशीर डिजिटल फलकासंबंधी स्पष्ट आदेश आहेत. सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने 'नो डिजिटल झोन' च्या चौकात डिजिटल फलक लावण्यास मनाईचे आदेश आहेत. तरीसुद्धा 'नो डिजिटल झोन' चौकात अनेक बेकायदेशीर डिजिटल फलक लावण्यात येत आहेत. त्यांच्यावर महानगरपालिकेच्या वतीने कोणतीच कारवाई करण्यात येत नाही. त्या आदेशाचे अंमलबजावणीतील त्रुटी आणि प्रशासकीय निष्क्रियतेबाबत महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांना सोलापूर शहरातील 'नो डिजिटल झोन' आदेश रद्द करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली.
शहरांमध्ये विविध नेत्याचे वाढदिवस पक्षीय राजकीय नेत्यांचे दौरे व अनेक कारणामुळे राजकीय नेते व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी महानगरपालिकेच्या 'नो डिजिटल झोन' मध्ये बेकायदेशीर, विनापरवानगीने महानगरपालिकेच्या नाकावर टिच्चून डिजिटल फलक लावत आहेत. 
अशा बेकायदेशीर डिजिटल लावणाऱ्यांवर महानगरपालिकेच्या वतीने आजवर कोणतीच कारवाई झाल्याचं दिसत नाही, शहरात डिजिटल लावण्याची पेव फुटले आहे. त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे. हे फलक लावताना कोणतीच कायदेशीर परवानगी घेतली जात नाही. महानगरपालिका अधिकारी त्यांच्यावर कोणतीच कारवाई करायला धजत नाहीत.
त्यामुळे सोलापूर महानगरपालिकेने शहरात 'नो डिजिटल झोन' मध्ये डिजिटल लावता येणार नाही, असा आदेश काढला होता, मात्र, आज अनेक वर्षं महिने उलटूनही या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होताना दिसत नाही. 
त्यामुळे महापालिकेची प्रतिमा जनमाणसात मलीन होत आहे. प्रशासनाला या 'नो डिजिटल झोन' ची अंमलबजावणी करणे शक्य नसेल, तर हा अपूर्ण आणि दिशाभूल करणारा आदेश त्वरित रद्द करण्यात यावा, यापुढे कोणालाही कुठेही डिटेल फलक लावण्यास मनाई करण्यात येऊ नये, नाही तर महानगरपालिका प्रशासनाने नो डिजिटल झोन च्या आदेशाची कठोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
