तडजोडीअंती 1, 20,000 रुपयांची लाच...! पोलीस हवालदारासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

shivrajya patra

सोलापूर : अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याकडील दाखल गुन्ह्यात वाहन वापरल्याचा संशय असल्यावरून ताब्यात घेतलेले वाहन आणि मोबाईल परत देण्यासाठी दोन पोलीस अंमलदारांनी तडजोडी अंती 1, 20,000 रुपयांची लाच खाजगी इसमाच्या हस्ते स्विकारताना मंगळवारी सकाळी रंगेहाथ पकडण्यात आलंय. अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात या तिघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं सांगण्यात आलंय.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, या घटनेत तक्रारदार याची स्कॉर्पिओ गाडी त्याच्या मित्राने फिरण्यासाठी मागून घेतली होती. ते वाहन अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 366/2026 या गुन्ह्यात वापरली असल्याचा संशय असल्याने पोलीस हवालदार कोळी व पोकॉ देडे यांनी स्कॉर्पिओ गाडी आणि
तक्रारदाराच्या लहान भावाचा मोबाईल चार दिवसापूर्वी ताब्यात घेतला होता.

लोकसेवक पोलीस हवालदार/567 राजशेखर रामचंद्र कोळी, पोकॉ/619 लक्ष्मीकांत दत्तात्रय देडे ( दोघे-नेमणुक अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण आणि रा. अशोक चौक, सोलापूर) यांनी संशयावरून तक्रारदार यांची स्कॉर्पिओ गाडी काढून घेतली होती.

त्याच वेळी लोकसेवक पोलीस हवालदार कोळी व पोकॉ देडे यांनी तक्रारदाराचे वडील व काका यांना या गुन्ह्यात नाव टाकून अटक करतो, अशी धमकीही दिली . ती गाडी आणि मोबाईल परत देण्याबरोबरच तक्रारदार यांचे वडील व काकांना जामीन करुन देण्यासाठी लोकसेवक पोलीस हवालदार कोळी व पोकॉ देडे  यांनी खाजगी इसम आकाश शरण्णाप्पा काडरामे (वय-33 वर्षे, रा. आझाद गल्ली, अक्कलकोट) याच्याकरवी सुरुवातीला 1, 40,000 रुपयांची लाच रक्कमेची मागणी केली होती.

त्यात तडजोडीअंती 1, 20,000 रुपये खाजगी इसम आकाश काडरामे याच्याकडे देण्याचे ठरले होते. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर कार्यालयाकडं तक्रार आल्यावर, त्याची पडताळणी करून मंगळवारी सकाळी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यासमोर एसीबीच्या पथकानं सापळा रचला होता. त्यात खाजगी इसम आकाश काडरामे हा लोकसेवक पोलीस हवालदार कोळी व पोकॉ देडे यांच्याकरीता स्विकारताना रंगेहाथ सापडला. अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात या त्रिकुटाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस निरीक्षक रविंद्र लांभाते यांच्याकडं या गुन्ह्याचा पुढील तपास सोपविण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त/पोलीस अधिक्षक
शिरीष सरदेशपांडे (ए.सी.बी., पुणे. मो.क्र 9823167154), अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील (ए.सी.बी., पुणे. मो.क्र 9029030530, अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले (ए.सी.बी. पुणे. मो.क्र 8390026549) आणि पोलीस उपअधीक्षक . प्रशांत चौगुले (ए.सी.बी., सोलापूर. मो.क्र. 9823225465) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र लांभाते, पोलीस अंमलदार पोह/संतोष नरोटे, पोकॉ/ गजानन किणगी, चापोकॉ/ अक्षय श्रीराम (सर्व नेमणूक : ए.सी.बी. सोलापूर) यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

.....चौकट
नागरिकांना आवाहन !
लोकसेवक शासकीय अधिकारी/कर्मचारी किंवा त्यांच्यावतीने खाजगी इसम (एजंट) हे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास त्याबाबत तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर कार्यालयास संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले (ए.सी.बी., सोलापूर. मो.क्र. 9823225465) यांनी केलं आहे.

To Top