"प्रवेशोत्सवाच्या जल्लोषात नवागतांचे शिक्षणाधिकाऱ्यांच्या हस्ते स्वागत; विद्यार्थ्यांना प्रेरणेचा नवा संदेश"
सोलापूर : विद्यार्थ्यांची मोठी स्वप्ने असावीत. ती साकारण्यासाठी अपयशाला न घाबरता कठोर परिश्रम केलं पाहिजे, प्रयत्नाचं सातत्य यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवितं. त्यासाठी प्रत्येकानं अखंडपणे प्रयत्न करीत राहिलं पाहिजे, असा महत्वपूर्ण संदेश शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी नवप्रवेशित विद्यार्थ्यांना दिला.
येथील अक्कलकोट रोडवरील, सद्संकल्प शिक्षण समूहाच्या राष्ट्रसंत प्राथमिक शाळा व विश्वभूषण विद्यालयामध्ये नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी प्रवेशोत्सव व नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात करण्यात आले.
या कार्यक्रमास शिक्षणाधिकारी (माध्यमिक, जिल्हा परिषद सोलापूर) सचिन जगताप यांची प्रमुख अतिथी उपस्थिती होती. सद्संकल्प शिक्षण समूहाचे संस्थापक सचिव समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
कार्यक्रमाची सुरुवात ज्ञानज्योती माता सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर नवागत विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन व टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. याप्रसंगी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सचिन जगताप बोलत होते.
यावेळी सूरज अंबुरे , गुरु रेवे, अरविंद ताटे (माध्यमिक शिक्षण विभाग, सोलापूर), संस्थेचे कोषाध्यक्ष बोधिप्रकाश गायकवाड, मुख्याध्यापक सत्यवान पाचकुडवे आणि मुख्याध्यापिका मंजुश्री भालशंकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
नवीन विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह ओसंडून वाहत होता. यावेळी विद्यार्थ्यांना शासनाकडून प्राप्त झालेल्या मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी नवीन पुस्तकांचे आनंदाने स्वागत केले. सोमवारी नो व्हेईकल डे असल्यामुळे शिक्षण अधिकारी सचिन जगताप कार्यक्रमास सायकलवर आले होते.
भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी अत्यंत साधारण परिस्थितीतून शिक्षणाच्या बळावर देशाच्या राष्ट्रपतीपदापर्यंत मजल मारली. त्यांचं शिस्तबद्ध जीवन, विज्ञानावरील प्रेम, देशभक्ती आणि विद्यार्थ्यांबद्दलची आत्मीयता अशा विविध पैलूवर बोलताना, शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा आदर्श प्रत्येक विद्यार्थ्यानं घ्यावा, असं आवाहन केलं.



