महाराष्ट्र विधानपरिषद स्थानिक प्राधिकार मतदार संघ द्विवार्षिक निवडणूक 2026
सोलापूर : महाराष्ट्र विधानपरिषद स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेच्या प्राथमिक टप्प्यातील प्रशिक्षण पूर्ण झाले. या प्रशिक्षणास जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी एस. कार्तिकेयन, उपजिल्हाधिकारी संतोष कुमार देशमुख, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुशांत बनसोडे, निवडणूक निरीक्षक श्रवण हार्डीकर तसेच सर्व तहसीलदार अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
उपजिल्हाधिकारी संतोष कुमार देशमुख यांनी मतदान प्रक्रियेची संपूर्ण माहिती दिली. या निवडणुकीसाठी 6 मतदान केंद्रे, 2 उमेदवार आणि एकूण 616 मतदार निश्चित करण्यात आले आहेत. निवडणूक जाहीर व आचारसंहिता दिनांक 18 मे 2026 रोजी लागू झाली असून मतदान दिनांक 18 जून 2026 सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत होईल. 
मतमोजणी 22 जून 2026 रोजी पार पडणार आहे.मतदान केंद्रांवर मतदारांची यादी पुरविण्यात येणार असून अधिकारी व कर्मचारी यांनी ती नीट तपासून खात्री करावी. नगरपंचायत व नगरपरिषद केंद्रांवर मतदारांची ओळख पटविण्यासाठी गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी व संबंधित अधिकारी उपस्थित राहतील.
मतदान अधिकारी नियुक्ती : क्षेत्रीय अधिकारी – उपजिल्हाधिकारी मतदान केंद्राध्यक्ष – तहसिलदारमतदान अधिकारी क्र.1 – नायब तहसिलदार मतदान अधिकारी क्र.2 – अव्वल कारकून मतदान अधिकारी क्र.3 – अव्वल कारकून/लिपिकमतदान कर्मचारी – शिपाई स्थानिक स्वराज संस्थेचे मुख्याधिकारी व गटविकास अधिकारी यांची मतदार ओळख पटविण्यासाठी नेमणूक करण्यात आली आहे.
मतदान पद्धत : मतदारांना उमेदवाराच्या नावासमोर पसंती क्रम अंकात लिहावा लागेल. हा क्रमांक मराठी, इंग्रजी, रोमन किंवा भारतीय भाषांतील अंकात लिहिता येईल, परंतु शब्दात लिहिता येणार नाही. भारत निवडणूक आयोगाने पुरविलेला जांभळा स्केचपेन वापरूनच मतदान करावे. प्रत्येक मतपत्रिकेला काउंटर फाईल असेल, ज्यावर मतदार यादी भाग क्रमांक, अनुक्रमांक व मतदाराची स्वाक्षरी/अंगठा नोंदविला जाईल.
निवडणूक साहित्य वितरण : दिनांक 17 जून २०२६ रोजी सकाळी 9 वाजता बहुद्देशीय सभागृह, जुने जिल्हाधिकारी कार्यालय येथे साहित्य वितरण होईल. मतदान केंद्राध्यक्षांनी मतपेटी, मतपत्रिका, स्केचपेन, सील, टॅग, मतदार यादी इत्यादी साहित्याची काळजीपूर्वक तपासणी करावी.
मतदान केंद्रावरील दक्षता : मतदान केंद्रावर 100 मीटर परिसरात सुरक्षा यंत्रणा राबविण्यात येईल. मतदान पथक व प्रतिनिधींनी गोपनीयतेची शपथ घ्यावी. मतदान केंद्रात मोबाईल, स्मार्टवॉच यांसारखी उपकरणे नेण्यास बंदी असेल. मतदाराने मतपत्रिका दाखविल्यास ती रद्द केली जाईल.

जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी निवडणूक यशस्वीपणे पार पाडण्यासाठी बारकाईने लक्ष ठेवण्याचे आवाहन केले. मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून त्यांचा योग्य वापर करावा, असेही त्यांनी सांगितले.
*****

