सोलापूर व धाराशिवचे कुमार व मुली संघ उपांत्य फेरीत

shivrajya patra

५२ वी राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धा : सांगली, ठाणे, पुणे, मुंबई उपनगर यांचीही उपांत्य फेरीत धडक 

सोलापूर/०४ जून (स्वर्गीय अजितदादा पवार क्रीडा नगरीतून ) : कुमार व मुली गटाच्या ५२व्या राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत मुलींच्या गटात सांगली, सोलापूर, धाराशिव व ठाणे तर कुमार गटात धाराशिव, पुणे, मुंबई उपनगर व सोलापूर या संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला.

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने, सोलापूर ॲम्युचर खो-खो असोसिएशन व किरण स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा नेहरूनगर येथील शासकीय मैदानावर सुरू आहे. 

---------

कुमार गट : सोलापूरची ठाण्यावर ड्रीम रनवर मात 

गुरुवारी झालेल्या चुरशीच्या उपांत्यपूर्व लढतीत कुमार गटात सोलापूरने ठाणेवर ४२-४० अशी दोन गुणांनी निसटती मात केली. मध्यंतरास दोन्ही संघ २०-२० अशा बरोबरीत होते. परंतु मध्यंतरास एक व मध्यंतरानंतरच्या अंतिम डावात एक हे ड्रीम रनच सोलापूरला विजय मिळवून दिले. सोलापूरकडून अकबर शेखने ८ तर रोहन मोरे (१. २० मि.), सिद्धार्थ माने देशमुख (१. ०० मि.) व अभय गवळी (१.००) यांनी प्रत्येकी सहा गुण संघास मिळवून दिले. ठाण्याकडून विनायक भांगे (16 गुण) व ओंकार  सावंत याने (२. ०० मिनिटे व २ गुण ) यांनी लढत दिली.

--------

काय आहे ड्रीम रन 

तीन खेळाडूंची एक तुकडी मैदानात संरक्षणासाठी जात असते. ही तुकडी जर 3 मिनिट मैदानात टिकून राहिली तर संरक्षण करणाऱ्या संघास 1 ड्रीम रन मिळतो. जर तीच तुकडी तीन मिनिटानंतर परत एक मिनिट पळाली तर अजून एक ड्रीम रन या पद्धतीत खेळ पुढे चालतो. अशा पद्धतीने सोलापूरला मध्यंतरास एक व मध्यंतरानंतरच्या अंतिम डावात एक ड्रीम रन मिळाला.

-------

दुसऱ्या सामन्यात धाराशिवने अहिल्यानगरवर ४९-२८ असा दणदणीत विजय मिळविला. अष्टपैलू कामगिरी करणारे हरद्या वसावे (२. २० मि. व ८ गुण ) व राज जाधव (१. ३० मि. व १० गुण ) हे त्यांच्या विजयाचे शिल्पकार ठरले. अहिल्यानगरकडून गौरव कुडले (१. १०, १. २०, १. ३० मि. व ८ गुण ) याची अष्टपैलू खेळी अपुरी पडली.

तिसऱ्या सामन्यात मुंबई उपनगरने सांगलीस ४०-३६ असे नमविले. मध्यंतराची २४-१६ ही आघाडीच त्यांना विजय मिळवून दिली. मुंबई उपनगरकडून समर्थ सावंत (१८ गुण व २.०० मि.), अमेय मुर्चावडे(२. ००,१. ३० मि.) व सांगलीकडून पार्थ देवकते (१. २० मि. १० गुण ) यांची खेळी उल्लेखनीय झाली.

चौथ्या उपांत्यपूर्व सामन्यात पुण्याने साताऱ्यास ४८-३६ असे हरविले. पुण्याच्या आदेश पाटीलने तब्बल 16 गुण मिळविले. अद्वैत बेतने (१.०५ मि. ८ गुण )अष्टपैलू खेळ केला. साताराच्या तबरेज खान (१. २० मि. व १२ गुण) याची अष्टपैलू खेळी अपुरी पडली.



-------------

मुली गट : धाराशिवची पुण्यावर एका गुणाने मात

मुलींच्या गटात अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात धाराशिवने पुण्यावर २७-२६ अशी एका गुणाने निसटती मात केली. मध्यंतरास धाराशिवने १५-११ अशी निर्णायक आघाडी घेतली होती. परंतु मध्यंतरानंतर पुण्याने बहारदार खेळी करीत संघाचा विजय खेचून आणण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. मैथिली पवार (४. ५०,१. ५० मि. नाबाद व ६ गुण ) सिद्धी भोसले (१. ४० मि. व ६गुण) हे धाराशिवच्या विजयाचे शिल्पकार ठरले. पुण्याकडून श्वेता नवले २. २०, १. २० मि. व ६ गुण ) आर्या चोरमोले (सहा गुण) यांची खेळी अपुरी पडली.

दुसऱ्या सामन्यात स्नेहा लामकाने (३. ३० मि. व १० गुण) व अश्विनी मांडवे (२. ०० मि. ८ गुण )यांच्या अष्टपैलू खेळामुळे सोलापूर ते नाशिकवर २९-२१ असा एक डाव राखून दणदणीत विजय मिळवला. नाशिककडून जयश्री पवार (२. १० मि. व ६ गुण ) हिची अष्टपैलू खेळी एकाकी ठरली.

तिसऱ्या सामन्यात सांगलीनेही रत्नागिरीवर २९-१२ असा डावाने विजय मिळविला. सांगलीकडून विद्या तामखेडे (१. ३०मि. व ६ गुण) व धनश्री तामखेडे (४. १० व २ गुण) तर रत्नागिरीकडून आर्या डोरलीकर (२. २० मि. व नाबाद १. ०० मि.) यांची खेळी उल्लेखनीय झाली.

चौथ्या सामन्यात ठाण्याने सातारावर ३३-२० असा ५. ५० मि. राखून मात केली. ठाण्याकडून धनश्री कंक (२. ५० मि. व १२ गुण), प्रणिती जगदाळे (२. ००,१. १० मि. नाबाद व गुण ) तर साताराकडून अक्षरा सोळुंखे (१. २० मि. व ८ गुण ) यांची कामगिरी उल्लेखनीय झाली.

--------

असे होणार उपांत्य सामने : 

कुमार: धाराशिव वि. पुणे व मुंबई उपनगर वि सोलापूर.

मुली : सांगली वि. सोलापूर  व  धाराशिव वि ठाणे.

--------

To Top